जेएनएन, नवी दिल्ली. Ashadhi Ekadashi in Delhi: आषाढी एकादशीनिमित्त राजधानीत आयोजित 5 व्या सांकेतिक वारीत हजारो दिल्लीकर मराठी बांधव न्हाऊन निघाले. दिल्लीतील रस्ते विठुरायाच्या नामस्मरणात भक्तीरसात दंग होवून, भर पावसात 'भेटीलागीं जीवा लागलीसे आस'चे पुन्हा एकदा साक्षीदार ठरले. पारंपारिक वेशभूषा, फुगड्या घालत विठ्ठलाच्या भक्तीभावात तल्लीन होऊन ही वारी  पहाटे सहा वाजता बाबा खडकसिंह मार्गावरील हनुमान मंदिर येथून आर. के. पुरम सेक्टर-6 येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या दिशेने निघाली होती.

भगवे झेंडे हाती घेवून, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, कपाळी टिळा लावलेल्या असंख्य भाविकांमुळे वातावरण भक्तीमय झाले होते. 'जय जय रामकृष्ण हरी' नामाचा गजर करीत वारीनिमित्त पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

भक्तीच्या महारसात, 15 किलोमीटरची वारी करीत वैष्णवांचा हा मेळा दिल्लीकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले. वारीमध्ये दिल्लीचे खासदार मनोज तिवारी, खासदार धैर्यशील पाटील, महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला, इंदिरा गांधी कला केंद्राचे सदस्य सचिव सच्चिदानंद जोशी, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, केंद्र शासनाच्या विविध विभागात असणारे मराठी अधिकारी या वारीत सहभागी झाले. 

हनुमान मंदिर, कॅनाॅट प्लेस, बाबा खडकसिंह मार्ग गोल डाकखाना, डाॅ.राम मनोहर लोहिया हाॅस्पिटल, तीन मूर्ती चौराहा, 11 मूर्ती तिठ्ठा, सरदार पटेल मार्ग, कौटिल्य मार्ग, शांतीपथ, मोतीबाग फ्लायओव्हर, राव तुलाराम मार्ग, मेजर सोमनाथ पथ, सागर सिनेमा, तमिल संगम असे मार्गक्रमण करीत वारीची सांगता विठ्ठल मंदिर, रामकृष्ण पुरम येथे झाली. यावेळी आर के पुरम येथील विठ्ठल मंदिरात महापूजा आणि पांडुरंगांची महाआरती संपन्न झाली.

महाराष्ट्र संस्कृतीच्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या वारी परंपरेत मागील 5 वर्षांपासून दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे सदस्य सहभागी होतात. साधारण 8 ते 9 दिवसात आळंदी ते पंढरपूरपर्यंतची मार्गक्रमण पूर्ण करून विठ्ठलाचा आशीर्वाद समस्त दिल्लीकर बांधवांसाठी घेऊन येतात. याही वर्षी हे वारकरी विठ्ठल दर्शन घेऊन दिल्लीतील या सांकेतिक वारीत सर्वांसमवेत सहभागी झाले होते, अशी माहिती दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे यांनी दिली.

वारीची शिस्त ठरले दिल्लीकरांचे आकर्षण

    देशाच्या राजधानीत  अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निघणारी सांकेतिक वारी हे दिल्लीकरांसह पोलीस प्रशासनासाठी ही नवा परिपाठ ठरला. नवी दिल्लीतील प्रमुख मार्गामधून जाणारी आणि सुमारे एक ते दीड हजार लोकांचा समावेश असलेली ही वारी अतिशय शांततेने पार पाडली. त्याचप्रमाणे वारी मार्गावर सहभागी वारकऱ्यांसाठी सर्व सुविधांचे आणि फराळाचे आयोजन भाविकांनी केले होते.

    दिल्लीतही रुजते आहे भजनी मंडळांची परंपरा 

    महाराष्ट्रामध्ये अनेक भजनी मंडळ असतेच. महाराष्ट्रातील हीच परंपरा आता दिल्लीतही सुरू झाली आहे. यंदाच्या सांकेतिक वारीमध्ये एक नव्हे तर तीन भजनी मंडळे सहभागी झाली होती. यंदाच्या वर्षीचे एक भजनी मंडळ म्हणजे 16 वर्षाखालील मराठी तरुण मुलांचे होते. एक भजनी मंडळ महिलांचे होते तर अन्य एक भजनी मंडळ तर दिल्लीतील मराठी तरुणांचे होते. सांकेतिक वारीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांनी या भजनी मंडळाच्या सुरेल भजनांचाही आनंद लुटला.