मुंबई - अनंतचतुर्थीला मुंबईसह राज्यभरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. या 10 दिवसांच्या उत्साह पर्वाची उद्या भव्य मिरवणुकीने सांगता होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत लाखो भक्त विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. विशेषत म्हणजे दक्षिण मुंबईतील चौपाटीवर प्रचंड गर्दी होत असल्याने मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणेशोत्सवाच्या दहाव्या आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीदिवशी मूर्ती विसर्जनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबईत 21,000 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.
विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदाच एआयचा वापर -
मिळालेल्या माहितीनुसार विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदाच, पोलिस मार्ग व्यवस्थापन आणि इतर वाहतूक-संबंधित अपडेटसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता artificial intelligence (AI) चा वापर केला जाणार आहे. गिरगाव चौपाटीवर एआय-आधारित नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, तर प्रमुख गणपती मंडळांना क्यूआर कोड आणि विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या वाहनांसाठी स्टिकर्स देण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
यामुळे पोलिसांना वाहने शोधण्यास, गर्दीवर लक्ष ठेवण्यास मदत होईल जेणेकरून वाहतूक वळवण्यासाठी रिअल टाइममध्ये त्यांचे व्यवस्थापन करता येईल. AI तंत्रज्ञानाचा वापर करून संशयित हालचालींवर व गर्दीवर नजर ठेवली जाणार आहे.
ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने हवाई निरीक्षण केले जाणार आहे. गर्दी आणि मिरवणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रोनमध्ये सार्वजनिक भाषण प्रणाली तसेच सुरक्षिततेच्या उद्देशाने दिवे असतील, असे अधिकाऱ्याने सांगितले. हे ड्रोन शहरातील 10,000 सीसीटीव्हींसह गर्दीवर लक्ष ठेवतील, असे त्यांनी सांगितले. खाजगी ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
पोलीस बंदोबस्तात 12 अतिरिक्त पोलिस आयुक्त, 40 उपायुक्त, 61 सहाय्यक आयुक्त, 3000 अधिकारी आणि 18,000 पोलिस कर्मचारी सहभागी असतील, असे सह पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याशिवाय, राज्य राखीव पोलिस दलाच्या 14 कंपन्या, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या चार कंपन्या, जलद प्रतिसाद पथके आणि बॉम्ब शोधक आणि निकामी पथके (BDDS) देखील तैनात असतील, अशी माहिती चौधरी यांनी दिली.
शहरातील विविध समुद्रकिनारे, इतर जलस्रोत आणि 205 कृत्रिम तलावांमध्ये किमान 6,500 सामुदायिक गणेशमूर्ती आणि 1.75 लाख घरगुती मूर्तींचे विसर्जन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने पोलिसांनी सुरक्षेची तयारी केली आहे, असे त्यांनी सांगितले. विसर्जन स्थळांवर जीवरक्षकही तैनात असतील.
गणेश मूर्ती विसर्जनासाठी जोडलेल्या रस्त्यांवर 3000 हून अधिक वाहतूक पोलिस कर्मचारी आणि 285 महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी तैनात केले जातील. सुरळीत वाहतूकीसाठी काही रस्त्यांवर वळवण्यात येतील, तर काही रस्ते ब्लॉक राहतील, असे सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अवजड वाहनांना शहरात बंदी -
शहरातील गणेश मिरवणुकांना त्रास होऊ नये म्हणून, शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून रविवारच्या मध्यरात्रीपर्यंत सर्व अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीदरम्यान जुन्या रेल्वे पुलांवर थांबू नये असे सांगण्यात आले आहे. एका पुलावर एका वेळी 100 लोकांची मर्यादा आहे, असे ते म्हणाले.
यामध्ये घाटकोपर, करी रोड, आर्थर रोड आणि भायखळा तसेच मरीन लाइन्स, सँडहर्स्ट रोड, महालक्ष्मी, प्रभादेवी-कॅरोल, दादर-टिळक आरओबी, ग्रँट रोड आणि चर्नी रोड दरम्यान फ्रेंच आरओबी आणि ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल दरम्यान फॉकलंड पूल यांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.