जेएनएन, मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली असून, महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द
संकटाच्या या कठीण काळात प्रत्येक नेत्याने महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभं राहणं गरजेचे असल्याचे तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करत थेट पूरग्रस्त भागात भेट दिली. आज ते सोलापूर, धाराशीव आणि बीड या जिल्ह्यांना स्वतः भेट देत असून, स्थानिक मंत्र्यांसोबत पूरपरिस्थितीची पाहणी करत आहेत.
मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मानवी जीव, घरे, जनावरे, शेतजमिनी व खरीप-बागायती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. ही परिस्थिती हृदय पिळवटून टाकणारी आहे.
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) September 24, 2025
या कठीण काळात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या निर्देशानुसार… pic.twitter.com/2uPc9vVXXE
मदतीचे काम सुरू
अजित पवार यांनी आज पीडित नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाला तातडीने शेतकऱ्यांसाठी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांनी आपापल्या भागात मदतीचे काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
राष्ट्रवादी पक्ष नागरिकांसाठी खंबीरपणे उभा
यासोबतच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लवकरच आणखी काही मदत योजनांची घोषणा करण्यात येणार असल्याचेही सुनील तटकरे यांनी सांगितले. पक्षाच्या या एकत्रित उपक्रमामुळे पूरग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी खंबीरपणे उभा आहे असेही ते म्हणाले.