जेएनएन, सोलापूर: अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे आयोजित “हिंदू जन आक्रोश मोर्चा” या कार्यक्रमात बोलताना जगताप यांनी “दिवाळीची खरेदी फक्त हिंदू दुकानदारांकडूनच करा, दिवाळीचा नफा हिंदू समाजालाच मिळाला पाहिजे” असे आवाहन केले.
या वक्तव्यामुळे केवळ विरोधकच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटातून नाराजीचे सूर उमटले आहेत. पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीतील नेत्यांनी जगताप यांच्या वक्तव्याला “धार्मिक द्वेष पसरवणारे” आणि “पक्षाच्या तत्त्वांशी विसंगत” असे संबोधत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबईतील राष्ट्रवादीचे माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी जगताप यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सिद्दीकी म्हणाले,“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व धर्म, जाती आणि पंथांना समानतेने वागवण्याच्या विचारधारेवर चालतो. संग्राम जगताप यांचे वक्तव्य पक्षविरोधी असून, धार्मिक द्वेष पसरवणारे आहे. पक्षाने त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान, पक्षश्रेष्ठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून, अंतर्गत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते. अजित पवार यांनी खासगी बैठकीत “पक्षाचे नेते सार्वजनिक मंचावर अशा प्रकारचे विधान करू नयेत” अशी स्पष्ट सूचना दिल्याचे समजते.
संग्राम जगताप यांच्या वक्तव्यामुळे सध्या राष्ट्रवादीमध्ये अल्पसंख्याक नेते आणि स्थानिक पदाधिकारी यांच्यात तीव्र मतभेद झाले आहेत. काही नेत्यांनी या वक्तव्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचे सांगत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा: Shivajirao Kardile Passes Away: भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन, वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास