जेएनएन, मुंबई: राज्य शासनाने सन 2025-26 च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी राज्य निवड समितीच्या शिफारशीनुसार विविध प्रवर्गांतील 123 शिक्षकांची निवड केली आहे. समाजाची निःस्वार्थ भावनेने सेवा करणाऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात.

निवड झालेल्या शिक्षकांमध्ये प्राथमिक प्रवर्गातील 38, माध्यमिक प्रवर्गातील 39, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे 19 प्राथमिक शिक्षक, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका प्रवर्गातील आठ, विशेष शिक्षक (कला) प्रवर्गातील आठ, विशेष शिक्षक (क्रीडा) प्रवर्गातील आठ, दिव्यांग शिक्षक किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील एक शिक्षक आणि स्काऊट व गाईड प्रवर्गातील प्रत्येकी एक अशा दोन शिक्षकांचा समावेश आहे. प्रवर्गनिहाय निवड झालेल्या सर्व शिक्षकांची नावे https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202611271711253449.pdf  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

राज्य शिक्षक पुरस्कार योजना महाराष्ट्रात सन 1962-63पासून राबविण्यात येत आहे. सन 2021-22 पासून पुरस्काराच्या निकषांमध्ये सुधारणा करून ही योजना ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ या नावाने राबविण्यात येत आहे. पुरस्काराची रक्कम 10 हजार रुपये असून, राष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना संबंधित तरतुदीनुसार एक लाख रुपयांची ठोक रक्कम दिली जाते.

राज्य निवड समितीने 25 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या बैठकीत शिक्षकांची अंतिम निवड केली असून निवड झालेल्या शिक्षकांचा पुरस्कार वितरण कार्यक्रम 3 डिसेंबर 2026 रोजी मुंबई येथे होणार असल्याचे विभागामार्फत कळविण्यात आले आहे.