मुंबई -BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात पोहोचला असून, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत (मनसे) युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री उशिरापर्यंत ‘मातोश्री’ वरून उमेदवारांना अधिकृत एबी फॉर्म वाटप करण्यास सुरुवात केली.
रविवारी रात्रीपासूनच मातोश्री परिसरात उमेदवारी निश्चित झालेल्या इच्छुक उमेदवारांची, त्यांच्या समर्थकांची आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. जागावाटपाचे चित्र स्पष्ट होताच ठाकरे गटाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी आपली संपूर्ण ताकद मैदानात उतरवली आहे. ज्या उमेदवारांची नावे अंतिम झाली, त्यांना तातडीने फोन करून मातोश्रीवर बोलावण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रत्येक उमेदवाराशी संवाद साधत, निवडणुकीतील रणनीती, प्रभागातील समीकरणे आणि युतीचे महत्त्व स्पष्ट केले.
मनसेसोबतच्या नव्या समीकरणामुळे अनेक प्रभागांतील गणिते बदलली असून, ठाकरे गटाकडून शिस्तबद्ध उमेदवारी देण्यावर भर देण्यात आला आहे. एबी फॉर्मचे वाटप थेट पक्षप्रमुखांच्या हस्ते झाल्याने उमेदवारांमध्ये आत्मविश्वास वाढला असून, कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची लढाई बनली असून, ठाकरे गट–मनसे युतीमुळे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूंवरील रणनीतींवर परिणाम होणार आहे.
‘मातोश्री’वरून मिळालेल्या आदेशनंतर ठाकरे गटाने संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे.पुढील काही तासांत आणखी उमेदवार याद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.
शिवसेना (ठाकरे गट) – पहिली उमेदवार यादी
प्रभाग क्रमांक 54 – अंकित प्रभू
प्रभाग क्रमांक 59 – शैलेश फणसे
प्रभाग क्रमांक 60 – मेघना विशाल काकडे माने
प्रभाग क्रमांक 61 – सेजल दयानंद सावंत
प्रभाग क्रमांक 62 – झीशान चंगेज मुलतानी
प्रभाग क्रमांक 63 – देवेंद्र (बाळा) आंबेरकर
प्रभाग क्रमांक 64 – सबा हारून खान
प्रभाग क्रमांक 40 – सुहास वाडकर
