मुंबई - Mumbai Local Special Train : नवीन वर्षाच्या जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरच्या रात्री व 1 जानेवारी रोजी पहाटे मुंबईच्या (Mumbai News)उपनगरीय रेल्वे मार्गावर 12 विशेष लोकल गाड्या चालवल्या जातील, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये पश्चिम रेल्वेकडून आठ विशेष ट्रेन आणि मध्य रेल्वेकडून चार विशेष लोकल ट्रेन चालवल्या जाणार आहेत.
सीएसएमटी आणि कल्याण स्थानकांदरम्यान मुख्य मार्गावर दोन विशेष सेवा चालवल्या जातील, तर सीएसएमटी आणि पनवेल स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावर दोन विशेष ट्रेन चालवल्या जातील. या विशेष ट्रेन सर्व स्थानकांवर थांबतील, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
मध्य रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला एक विशेष लोकल ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून मध्यरात्री 1.30 वाजता सुटेल आणि मुख्य मार्गावर कल्याणला पहाटे 3.00 वाजता पोहोचेल. तर, दुसरी विशेष सेवा कल्याणहून मध्यरात्री 1:30 वाजता निघेल आणि सीएसएमटीला पहाटे 3:00 वाजता पोहोचेल.
हार्बर लाईन
हार्बर मार्गावरील नवीन वर्षाची विशेष उपनगरीय ट्रेन सीएसएमटीहून मध्यरात्री 1:30 वाजता सुटेल आणि पहाटे 2:50 वाजता पनवेलला पोहोचेल. त्याचप्रमाणे, दुसरी विशेष ट्रेन पनवेलहून मध्यरात्री 1.30 वाजता सुटेल आणि पहाटे 2:50 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा करताना हे देखील स्पष्ट केले आहे की चारही विशेष गाड्या त्यांच्या संबंधित मार्गांवरील सर्व स्थानकांवर थांबतील.
पश्चिम रेल्वे -
पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्यांच्या मार्गावरील आठ विशेष उपनगरीय लोकल चर्चगेट आणि विरार स्थानकांदरम्यान चालवल्या जातील.
यापैकी चार गाड्या चर्चगेटहून पहाटे 1:15, 2:00, 2:30 आणि 3:25 वाजता सुटतील, तर उर्वरित चार गाड्या विरारहून पहाटे 0:15, 0:45, 1:40 आणि 3:05 वाजता चर्चगेटकडे सुटतील, असे त्यांनी सांगितले.
