जेएनएन, मुंबई: राज्यातील बहुतांश ठिकाणी भाजप–शिवसेना महायुती होत असतांना मिरा-भाईंदर पालिका युतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक पातळीवर शिवसेना–भाजपमधील मतभेद टोकाला पोहचली आहे.
भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट भूमिका मांडली असून, युतीसाठी ठोस अटी ठेवल्या आहेत. शिवसेनेकडून भाजपच्या कार्यकर्त्यांना तिकिटाचे आमिष दाखवून पक्षात प्रवेश करून घेतल्याचा आरोप करत, असे सर्व कार्यकर्ते पुन्हा भाजपकडे परत करावेत, अशी प्रमुख अट नरेंद्र मेहता यांनी मांडली आहे. या मागणीमुळे मिरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण तापले आहे.
आमदार मेहता यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, स्थानिक पातळीवर पक्षफोडीचे राजकारण सुरू राहिल्यास युती टिकणे कठीण होईल. युती समानतेच्या आणि विश्वासाच्या आधारावर असावी, अन्यथा स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा पर्याय खुला आहे, असा इशाराही त्यांनी दिल्याचे समजते.
दरम्यान, युती तुटू नये यासाठी शिवसेना नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. मिरा-भाईंदरमधील दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी सरनाईक यांच्याकडून प्रयत्न सुरू असून, नाराजगी दूर करण्यासाठी बैठका आणि चर्चा केले जात आहेत.
मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत
येत्या काही दिवसांत दोन्ही पक्षांमध्ये तोडगा निघाला नाही, तर मिरा-भाईंदरमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यात महायुती एकसंघ असल्याचे चित्र असताना, मिरा-भाईंदरमधील हा वाद वरिष्ठ नेतृत्वासाठीही चिंतेचा विषय ठरत आहे. आता प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीने युती टिकते की स्थानिक राजकारण वेगळ्या दिशेने जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
