जेएनएन, संभाजीनगर: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमधील जागावाटपाचा तिढा अधिकच वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्यात मंगळवारी रात्री उशिरा महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक थेट संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या बैठकीला राज्याचे मंत्री अतुल सावे उपस्थित होते. संभाजीनगर महापालिकेतील जागावाटप, उमेदवारांची संख्या आणि दोन्ही पक्षांचा प्रभाव लक्षात घेऊन चर्चा झाली. मात्र, दीर्घ चर्चा होऊनही बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही,अशी माहिती समोर आली आहे.
संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांकडून मोठ्या संख्येने जागांची मागणी होत आहे. शिवसेनेकडून विद्यमान राजकीय ताकद आणि स्थानिक संघटनांचा आधार देत अधिक जागांची मागणी करण्यात येत आहे. तर भाजपकडून मागील निवडणुकांतील कामगिरी आणि सध्याचे राजकीय समीकरण पुढे करत तितक्याच आक्रमक पवित्र्यात चर्चा सुरू आहे.
रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत दोन्ही बाजूंनी आपापली भूमिका मांडल्याचे समजते. मात्र, जागावाटपाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड न झाल्याने संभाजीनगरमधील युतीचा पेच अद्याप कायम आहे.
दरम्यान, आज पुन्हा एकदा बावनकुळे आणि शिरसाट यांच्यात बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीत काही तोडगा निघतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. युती टिकवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हस्तक्षेप होणार असल्याची माहिती मिळत आहे. संभाजीनगर महापालिका निवडणुकीत युती एकत्र लढणार की स्वतंत्र, याचा निर्णय लवकरच स्पष्ट होणार आहेत.
