मुंबई/जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा आज 11 वा दिवस असून, सोमवारी मध्यरात्री त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना वेग आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी मध्यरात्री उशिरापर्यंत उच्चस्तरीय बैठक पार पडल्याची माहिती आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. उपोषणाचा कालावधी वाढत असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. वैद्यकीय पथकाकडून त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जात असून, समर्थक आणि मराठा समाजातील नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष
मराठा आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारही आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या मध्यरात्रीच्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.
या बैठकीत आंदोलनाची सद्यस्थिती, राज्यातील विविध भागांतील वातावरण, कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती तसेच सरकारसमोर उपलब्ध असलेले पर्याय याबाबत चर्चा करण्यात आल्याचे समजते. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची माहितीही बैठकीत घेण्यात आली.
आंदोलनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने ठोस आणि कायमस्वरूपी निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून सातत्याने केली जात आहे.
दरम्यान, उपोषणाचा 11 वा दिवस सुरू असल्याने पुढील काही तास दिवस महत्त्वाचे मानले जात आहेत. सरकारकडून जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार का, तसेच आंदोलनाबाबत कोणता ठोस निर्णय घेतला जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
