बीड - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यातून राजकीय नेत्यांना आगामी 2029 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट इशारा दिला. “जो जो नेता, जो पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल, तो नेता 2029 ला निवडून येऊ द्यायचा नाही,” असे म्हणत त्यांनी मराठा समाजाला राजकीय भूमिकेबाबत आवाहन केले. “जो आपल्यासाठी नाही, तो आपला नाही. 2029 साठी सगळे तयार आहेत का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
बीड जिल्ह्यातील नारायणगडावर आज मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून ते मराठा समाजाला आरक्षण बाबत राजकीय संदेश दिला. आगामी राजकारणाबाबत त्यांनी भूमिकाही मांडली आहे.
तीन वर्षांपासून स्वतःहून कोणत्याही नेत्याशी बोललो नाही
“मी तीन वर्षांच्या काळात कुणालाही स्वतःहून बोललेलो नाही,” असे सांगत जरांगे पाटील यांनी आपल्या भूमिकेचे संकेत दिले. मराठा समाजाच्या हिताच्या विरोधात जाणाऱ्या नेत्यांना आगामी निवडणुकीत राजकीय किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. मराठा समाजाने आपल्या हिताच्या मुद्द्यांवर एकत्र राहावे आणि समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्यांच्या भूमिकेचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
नारायणगडावरून मराठा समाजाला आवाहन
नारायणगडावरील दसरा मेळावा हा मराठा समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. यंदाच्या मेळाव्यात आरक्षणाच्या प्रश्नासोबतच शेतकऱ्यांच्या अडचणी, आर्थिक संकट आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाचे मुद्देही चर्चेत आहेत. जरांगे पाटील यांनी मेळाव्यात ‘मराठा सेवक’ उपक्रमाची घोषणा करत समाजातील अडचणी सोडवण्यासाठी संघटित पद्धतीने काम करण्याची भूमिका मांडली.
