जेएनएन, मुंबई. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत झालेल्या पावसानंतर आता महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली असताना राज्यातील हवामानात मोठे बदल झाले आहे. आज काही भागांत विजेच्या कडकडाटसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातील जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी हवामानातील बदलांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत आज सकाळपासूनच जोरदार पाऊस
राज्याची राजधानी मुंबईतही पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली असून ही आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुढील काही दिवस शहर आणि उपनगरांमध्ये हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 17 ते 21 ऑगस्टदरम्यान हवामानाच्या स्थितीत मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबमधील फिरोजपूरपासून मुझफ्फराबाद, पाटणा, तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राच्या केंद्रातून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. त्यामुळे देशातील काही भागांत मान्सूनची स्थिती सक्रिय राहण्याची शक्यता आहे.
मध्य भारत आणि लगतच्या दक्षिण भारतात समुद्रसपाटीपासून सुमारे 3.1 ते 9.4 किलोमीटर उंचीपर्यंत पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या परस्परविरोधी वाऱ्यांमुळे हवेचे जोड क्षेत्र कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.
याशिवाय पश्चिम मध्य प्रदेशाच्या परिसरात समुद्रसपाटीपासून सुमारे 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान प्रणालींच्या प्रभावामुळे राज्यातील काही भागांत स्थानिक स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता कायम आहे. मात्र, संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचे चित्र सध्या दिसत आहे.
