जेएनएन, नवी दिल्ली. मागील अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. अशा चर्चा सुरु आहेत. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मागील काळात केंद्रात सुरु असलेल्या घडामोडीवरून केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदल होऊ शकते अशा चर्चांना उधाण आले आहे. 

नुकतेच वादळी आणि विविध गोष्टींनी महत्त्वाचे ठरलेले संसदेचे पावसाळी अधिवेशन पार पडले आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेत कामकाजाच्या दरम्यान मोठा प्रमाणात गदारोळ घातला. त्यामुळे अनेक वेळा संसदेचे दोन्ही सभागृह तहकूब करावे लागले. दरम्यान, जंतरमंतर येथे झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे त्यांचे खाते हे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे तात्पुरते देण्यात आले आहे. तसंच, मागील काळात अनेक राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे काही मंत्री पदे खाली झाली आहेत. त्यामुळे केंद्रात मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतो, अशा चर्चा सध्या दिल्लीतील राजकीय वर्तुळात सुरु आहेत. 

फडणवीसांचा दोनदा दिल्ली दौरा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मागील महिन्याभरामध्ये दोनदा दिल्ली दौऱ्यावर आले. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह  विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांची पुढील केंद्रीय मंत्रीमंडळात विस्तारात वर्णी लागू शकते, अशी चर्चा सुरु आहे, याबाबत अद्याप कोणीही अधिकृत माहिती दिली नाही आहे.

फडणवीसांनी आज घेतली पंतप्रधानांची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, फडणवीसांनी ट्वीट करून या भेटीसंदर्भात माहिती दिली आहे. 

    फडणवीसांचे ट्वीट

    ‘देशाचे यशस्वी पंतप्रधान आणि भारताचे वैश्विक नेतृत्व नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती त्यांना दिली आणि केंद्र सरकारशी समन्वयातून राबविल्या जात असलेल्या योजना, प्रकल्पांबाबत सहकार्यही मागितले. नेहमीप्रमाणेच त्यांची भेट एक नवी ऊर्जा देणारी असते. त्यांचे विकासाच्या प्रश्नांवर बहुमूल्य मार्गदर्शन आणि महाराष्ट्राला भक्कम पाठिंबा, यासाठी मी त्यांचा नितांत आभारी आहे !’ असं फडणवीस यांनी ट्वीटमध्ये आहे.

    हेही वाचा - मनोज जरांगे यांची मोठी घोषणा! विदर्भ, मराठवाडा दौऱ्यानंतर ‘या’ दिवशी बसणार उपोषणला