मुंबई. Maharashtra Weather Update: राज्यात मान्सूनने पुन्हा जोरदार पुनरागमन केले असून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणासह घाटमाथ्यावरील भागांमध्ये मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही जिल्ह्यांमध्ये जनजीवनही विस्कळीत झाले आहे.

रायगड, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाटमाथा परिसरात पावसाचा जोर अधिक वाढला आहे. नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी शेतीचेही नुकसान झाले आहेत.

कोकण, विदर्भ आणि घाटमाथा परिसरासाठी ऑरेंज अलर्ट-

भारतीय हवामान विभागाने कोकण, विदर्भ आणि घाटमाथा परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता कमी असून, काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकणाच्या उत्तर भागात अतिवृष्टीचा इशारा -

हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथा भागात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यासोबतच मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः कोकणाच्या उत्तर भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

    संभाव्य पूरस्थिती, दरडी कोसळण्याच्या घटना आणि झाडे पडण्याचा धोका लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आवश्यक नसल्यास घाटमाथा आणि डोंगराळ भागात प्रवास टाळावा, तसेच नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

    दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या अधिकृत सूचना आणि स्थानिक प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.