मुंबई - मुंबईतील मुसळधार पावसादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साकीनाका परिसरात भर पावसात एक सुमारे 45 वर्षीय व्यक्ती उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी त्या व्यक्तीची फक्त छत्री आणि चप्पल आढळून आली आहे. संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी महापालिका, अग्निशमन दल, पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मिळाला मृतदेह

मुंबईतील साकीनाका येथील मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा अखेर मृतदेहच हाती लागला आहे. साधारण 45 वर्षांचा व्यक्ती सकाळी 11 च्या सुमारास मॅनहोलमध्ये पडली होती. जवळपास दोन तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. अस्लम शेख असं या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे साकीनाका परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. रस्त्यावर पाणी साचल्याने मॅनहोल पूर्णपणे झाकला गेला होता. याचवेळी संबंधित व्यक्तीचा तोल जाऊन तो उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींनी ही घटना पाहताच तात्काळ पोलिस आणि महापालिकेला माहिती दिली.

घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. पावसामुळे वाढलेला पाण्याचा प्रवाह आणि जलनिस्सारण वाहिन्यांमधील वेगवान पाणी यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. तरीही संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी विविध यंत्रणांकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

    दरम्यान, घटनास्थळी सापडलेली छत्री आणि चप्पल पाहून स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उघडे मॅनहोल, अपुरे सुरक्षा उपाय आणि जलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटींमुळे मुंबई महापालिकेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांनी अशा निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    प्रशासनाने नागरिकांना पाणी साचलेल्या रस्त्यांवरून चालताना किंवा वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसाच्या काळात पाण्याखाली झाकलेले मॅनहोल, खड्डे आणि उघडी गटारे दिसत नसल्याने जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.

    या घटनेमुळे मुंबईतील पावसाळी व्यवस्थापन, उघड्या मॅनहोलची सुरक्षा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.