जेएनएन, मुंबई. राज्यात सर्वत्र गणरायाचे आगमन झाले आहे. गणेशाच्या आगमणाला पावसानेही हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. राज्यात मागील दोन दिवसांत काही भागात पाऊस झाला आहे. मात्र, आता पुन्हा पावसाने विश्रांती घेतली आहे. IMD ने पुढील चार दिवसांत कोणताही पावसाचा इशारा दिलेला नाही.
हवामान विभागाने IMD राज्यातील हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये राज्यात पुढील चार दिवसांत कोणत्याही पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे.
पाऊस पुन्हा फिरला माघारी
IMD ने जारी केलेल्या हवामान अहवालानुसार राज्यात पावसाची शक्यता अल्पप्रमाणात आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या कमी पावसामुळे पिकांनी माना टाकल्या आहेत. मागील दोन दिवसांत पावसाचे वातावरण निर्माण झाल्या मुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, त्यावर आता पावसाने पाणी फेरले आहे. कारण IMD च्या अहवालानुसार राज्यात पावसाने माघार घेतली आहे. येत्या चार दिवसात कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आलेला नाही.

खरिपाची पिके धोक्यात
जून आणि जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे यंदा पिके चांगली आली होती. मात्र, ऐन भरणीच्या वेळी पावसाने दडी मारली आहे आणि उकाडा हा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे शेतातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. कोरडवाहू जमीनीवरील सोयाबिन, कापूस पिके सुकू लागली आहे. बळीराज्याला आपल्या डोळ्यादेखत करपलेली पिके पाहावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी खचला आहे.
