मुंबई - Maharashtra Weather Update : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये सध्या थंडीची लाट सक्रिय आहे. किमान तापमानाचा पारा मात्र सातत्याने 10 अंशांच्या खालीच नोंदवला जात आहे. विशेषतः पहाटे आणि रात्रीच्या वेळी तापमानात लक्षणीय घट होत असून, थंड वारे वाहू लागल्याने नागरिकांना गारठ्याचा अनुभव येत आहे. मात्र, दिवसा सूर्य माथ्यावर आल्यानंतर वातावरणात अचानक बदल होत असून अनेक भागांमध्ये उकाडा जाणवत आहे.
थंड हवामानस्थिती प्रामुख्याने किनारपट्टी भागांमध्ये ठळकपणे दिसून येत आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात सकाळी आणि रात्री थंडी जाणवत असली तरी दुपारच्या वेळी उष्णता वाढत आहे.वाढलेली आर्द्रता आणि कमी वाऱ्याचा वेग यामुळे उकाडा अधिक तीव्रतेने जाणवत असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका अधिक वाढण्याची शक्यता आहे. जरी हवामान विभागाने थंडीच्या लाटेचा इशारा दिलेला नसला, तरी गारठा मात्र कायम राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान सरासरी 7 ते 8 अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, काही ठिकाणी तापमान याहूनही खाली घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पहाटे दाट धुक्याची चादर दीर्घकाळ टिकून राहणार असल्याने दृश्यमानतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा थेट फटका रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला बसू शकतो. वाहनचालकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हवामानातील या बदलत्या स्थितीमुळे आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता असून, थंडी आणि उकाडा या दोन्ही टोकांच्या परिस्थितीपासून बचावासाठी नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. पुढील काही दिवस राज्यासाठी थंडी आणि उष्णतेचा संमिश्र अनुभव देणारे ठरणार असल्याचं हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.
