जेएनएन, मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)ला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव या भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या घडामोडीमुळे मुंबईतील राष्ट्रवादी SP च्या संघटनात्मक ताकदीवर गंभीर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

माहितीनुसार, राखी जाधव या गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या अंतर्गत निर्णयप्रक्रियेवर नाराजी व्यक्त करत असल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर राखी जाधव अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर त्या पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपशी संपर्क वाढल्याची चर्चा!

माहितीनुसार, राखी जाधव यांचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क वाढल्याचे सांगितले जात आहे. भाजपकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू असताना, राष्ट्रवादी SPमधील महत्त्वाच्या नेत्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता चर्चेचा विषय ठरत आहे. जर हा प्रवेश निश्चित झाला, तर भाजपसाठी ही मोठी राजकीय ताकद ठरणार आहे.

राष्ट्रवादी SP समोर संघटनात्मक संकट

राखी जाधव या राष्ट्रवादी SP च्या मुंबईतील प्रमुख चेहरा मानल्या जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या संभाव्य बाहेर पडण्यामुळे मुंबईतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुढील भूमिका काय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

    निवडणुकीच्या तोंडावर राजकीय उलथापालथ

    मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत असताना, राष्ट्रवादी शरद पवार गटातील ही संभाव्य फूट महाविकास आघाडीच्या गणितांवरही परिणाम करणारी ठरू शकते. काँग्रेससोबत सुरू असलेल्या आघाडीच्या चर्चांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.