जेएनएन, अलिबाग. Nagar Parishad Election Results : राज्यातील नगर परिषद, नगर पालिकांचे निकाल आज जाहीर झाले. भाजपने राज्यात दमदार कामगिरी करत 120 जागांवर विजय मिळवला असला तरी अलिबागमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला आहे. शेतकरी कामगार पक्षाने आपले बालेकिल्ला कायम राखत येथे भाजपला धूळ चारली आहे. शेकापच्या उमेदवार अक्षया

नाईक यांनी भाजपच्या तनुजा पेरेकर यांचा पराभव करत त्यांनी नगरपालिकेवर चार दशकांपासून असलेले शेकापचे वर्चस्व कायम राखले आहे. अक्षया नाईक या कुटूंबातील सातव्या नगराध्यक्ष असणार आहेत.

गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्या संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. राज्यात अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले आहेत. अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे यावेळी 23 वर्षाच्या अक्षया नाईक ही तरुणी राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष असणार आहे.

या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे पहिल्यांदाच शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हे पारंपरिक विरोधी पक्ष एकत्र आले  होते तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने युती करून त्यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले होके, 

अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत शेकापच्या अक्षया नाईक यांना 8,974 मते, तर तनुजा पेरेकर यांना 2,334 मते मिळाली. अक्षया नाईक यांनी 6,640 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत शेकापचा किल्ला अभेद्य असल्याचं पुन्हा सिद्ध केलं व सर्वात तरुण नगराध्यक्ष म्हणून मान मिळवला. तनुजा पेरेकर या काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्या होत्या. निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश करून भाजपने त्यांना निवडणुकीत उतरवले होते. मात्र त्यांची रणनिती पुरती फसली.

    या विजयासह अलिबाग नगरपालिकेवर गेल्या चार दशकांपासून कायम असलेले शेकापचे वर्चस्व आणखी भक्कम झाले आहे. अक्षया नाईक या नाईक कुटुंबातील सातव्या नगराध्यक्ष ठरणार आहेत.

    मुलगी नगराध्यक्ष तर वडील नगरसेवक -

    अलिबाग नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह 20 नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक पार पडली. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक हे बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे आता अलिबागच्या नगर परिषदेत मुलगी नगराध्यक्ष आणि वडील नगरसेवक असे चित्र दिसणार आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष अक्षया नाईक ठरल्या आहेत.