जेएनएन, मुंबई. राज्यातील दुष्काळग्रस्त भागात खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असतानाच सरकारने पंचनाम्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पीक नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याची सही घेणे आता आवश्यक करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या शेतातील नुकसानीची नोंद नेमकी कशी करण्यात आली आहे, याची माहिती शेतकऱ्याला प्रत्यक्ष पाहता येणार आहे.

यापूर्वी पीक नुकसानीच्या पंचनाम्यावर संबंधित सरपंच किंवा पोलीस पाटील यापैकी एका व्यक्तीची सही घेतली जात होती. मात्र, आता या प्रक्रियेत बदल करून पंचनामा पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याची सही घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पंचनाम्यात नोंदवण्यात आलेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्याचीही नोंद राहणार आहे. 

265 तालुक्यांत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू 

राज्य सरकारने यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-1’ लागू करण्यात आला असून दुष्काळी उपाययोजना सुरू करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार 28 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महसूल आणि कृषी विभागासह संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवली जात आहे. 

पंचनाम्यात छायाचित्रे, जीपीएस नोंदी

    पीक नुकसानीचे पंचनामे करताना केवळ कागदोपत्री नोंद न करता प्रत्यक्ष शेताची पाहणी करण्यावर भर देण्यात येत आहे. नुकसानीची छायाचित्रे आणि जीपीएस लोकेशनसह डिजिटल नोंद करण्याच्या सूचनाही देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती आणि पंचनाम्यातील नोंद यामध्ये सुसंगती ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

    काही जिल्ह्यांमध्ये तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांची संयुक्त पथके तयार करून शेतांवर प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. बाधित क्षेत्रातील एकही पीक नुकसान नोंदविल्याशिवाय राहू नये, याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. 

    शेतकऱ्याची सही का महत्त्वाची? 

    पंचनामा हा पुढील मदत आणि नुकसानभरपाईच्या प्रक्रियेसाठी महत्त्वाचा दस्तऐवज ठरतो. त्यामुळे पंचनाम्यात नुकसानग्रस्त क्षेत्र, पिकाचा प्रकार आणि नुकसानीची नोंद योग्य पद्धतीने होणे महत्त्वाचे आहे. आता पंचनामा पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याची सही घेतली जाणार असल्याने प्रत्यक्ष पाहणीदरम्यान झालेल्या नोंदीबाबत शेतकऱ्याला माहिती राहणार आहे. 

    सरकारने यापूर्वीच पंचनामे अचूक आणि वस्तुनिष्ठ करण्याचे निर्देश दिले आहेत. नुकसानीच्या पंचनाम्यांनंतरच पीक नुकसानीसाठी आर्थिक मदतीबाबत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

    शेतकऱ्यांना थेट मदतीची प्रतीक्षा 

    दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जवसुलीला स्थगिती, कृषीपंपांच्या वीजबिलात सवलत, रोजगार हमीच्या कामांमध्ये वाढ, तसेच आवश्यकतेनुसार पाणी व चारा उपलब्ध करून देण्यासारख्या उपाययोजना लागू करण्यात आले आहेत. मात्र, पीक नुकसानीच्या प्रमाणानुसार शेतकऱ्यांना मिळणारी थेट आर्थिक मदत पंचनाम्यांच्या अहवालानंतर निश्चित होणार आहे.यामुळे आता सुरू झालेल्या पंचनाम्यांकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पंचनामा करताना प्रत्यक्ष नुकसानीची नोंद, छायाचित्रे, जीपीएस माहिती आणि त्यावर संबंधित शेतकऱ्याची सही यामुळे नुकसान नोंदणीची प्रक्रिया अधिक स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.