जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Update: राज्यात एकीकडे पावसाचा जोर काहीसा कमी होत असताना दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता कायम आहे. आज कोकणातील रायगड, रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक घाटमाथा, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या भागांत मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या उपविभागीय इशाऱ्यानुसार कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता आहे.  

मात्र, राज्याच्या काही भागांत पावसासोबतच तापमानात वाढ होत असल्याचे चित्र आहे. सोलापूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाचा पारा 35 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे एका बाजूला काही भागांत पावसाचा इशारा असताना दुसऱ्या बाजूला उकाड्यात वाढ होत आहे. राज्यात पावसाचा जोर ओसरताच अनेक भागांमध्ये कमाल तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ होण्याचा अंदाज यापूर्वीही वर्तवण्यात आला आहे.  

परतीचा पाऊस महाराष्ट्रात कधी दाखल होणार? 

महाराष्ट्रात आता मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची चाहूल लागली आहे. हवामान विभागानुसार पुढील चार ते पाच दिवसांत परतीचा पाऊस महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत परतीच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. 

मात्र, परतीचा मान्सून म्हणजे राज्यात लगेच सर्वत्र पाऊस पूर्णपणे बंद होईल, असे नाही. स्थानिक हवामान प्रणाली, आर्द्रता आणि वाऱ्यांच्या स्थितीनुसार ऑक्टोबरमध्येही काही भागांत पाऊस सुरू राहू शकतो. हवामान विभागाच्या निकषांनुसार मान्सूनची माघार ही ठरावीक हवामानविषयक परिस्थिती सातत्याने निर्माण झाल्यानंतर जाहीर केली जाते.  

    1 ऑक्टोबरपासून तापमान वाढण्याचा अंदाज

    दरम्यान, 1 ऑक्टोबरपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तसेच किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर 9 ते 22 ऑक्टोबरदरम्यान राज्याच्या इतर भागांमध्येही तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या सुरुवातीला राज्यात काही ठिकाणी पाऊस, तर काही भागांत वाढता उकाडा असे परस्परविरोधी हवामान पाहायला मिळू शकते.