जेएनएन, नवी दिल्ली: देशभरात सध्या नवरात्रीची धूम सुरु आहे. सर्व नागरिक मोठ्या उत्साहात आदिशक्तीला वंदन करत आहेत. नवरात्रीचे नऊ दिवस सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्रात साडे तीन शक्तीपीठे आहेत. यांच्याविषयी माहिती घेऊया…

पौराणिक ग्रंथांनुसार संपूर्ण भारतीय उपखंडात देवी सतीची 51 शक्तीपीठे आहेत. यापैकी बहुतांश शक्तीपीठे भारतात आहेत, तर काही शक्तीपीठे नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका आणि तिबेट यांसारख्या शेजारील देशांमध्ये आहेत. भारतात सुमारे 42 शक्तीपीठे भारतातील विविध राज्यांमध्ये पसरलेली आहेत. यामध्ये महाराष्ट्रात साडे तीन शक्तीपीठे आहेत. 

महाराष्ट्रातील आदिशक्तीची साडेतीन शक्तीपीठे

  • महालक्ष्मी अंबाबाई, करवीर (कोल्हापूर): हे पहिले पूर्ण शक्तीपीठ मानले जाते. याविषयी आपण माहिती घेणार आहोत. 
  • तुळजाभवानी माता, तुळजापूर (जिल्हा धाराशिव): हे दुसरे पूर्ण शक्तीपीठ असून कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध आहे.
  • रेणुका माता, माहूरगड (जिल्हा नांदेड): हे तिसरे पूर्ण शक्तीपीठ आहे.
  • सप्तशृंगी माता, वणी (जिल्हा नाशिक): हे अर्धे शक्तीपीठ मानले जाते. येथे देवीची स्वयंभू अठराभुजा मूर्ती आहे.

हेही वाचा - Shardiya Navratri 2026: दुर्गा मातेच्या 9 रूपांना अर्पण करा 9 नैवेद्य; जाणून घ्या दिवसानुसार भोगाची यादी

  • करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर कोल्हापूर

करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरामधील एक आद्य स्वयंभू शक्तीपीठ आहे. हे आदिशक्तीचे महामातृक स्थान आहे. हे मंदिर भारतातील प्रमुख देवी मंदिरांपैकी एक असून आई अंबाबाई मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराला सुमारे बाराशे वर्षांचा इतिहास आहे. मंदिरातील एका शिलालेखानुसार, हे मंदिर चालुक्य राजवंशाच्या काळात, म्हणजेच 7 व्या शतकात बांधले गेले. चालुक्य राजांनी या मंदिराला भव्य स्वरूप दिले.

  • तुळजाभवानी माता, तुळजापूर

श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तुळजाभवानी संबंधित सर्वांत जुना शिलालेख तुळजापूर तालुक्यातील ‘काटी’ येथे इ.स. 1397 सालच्या शिलालेखात पहावयास मिळतो.

    • रेणुका माता, माहूरगड 

    नांदेड जिल्ह्यातील माहूर या तीर्थक्षेत्रात महाराष्ट्रातील तिसरे शक्तिपीठ आहे. माता रेणुका भगवान परशुरामांच्या सविनय प्रार्थनेला अनुमोदन देऊन जगत् कल्याणासाठी अनादी काळापासून मातापूर (माहूर) क्षेत्री विराजमान आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले हे निसर्गरम्य स्थान आध्यात्मिक शांती व चैतन्याचे उगमस्थान आहे.

    • सप्तशृंगी माता, वणी नाशिक

    नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता देवीचे मंदिर हे साडेतीन पीठांपैकी एक आद्य शक्तीपीठ आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते. देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते.