एजन्सी, गोंदिया: गोंदिया जिल्ह्यात भरधाव ट्रक आणि एसयूव्ही (SUV) यांच्यात झालेल्या धडकेत तीन वर्षांच्या मुलासह तब्बल सहा जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले.
सर्व मजूर मध्य प्रदेशातील
या अपघातातील बळी शेजारच्या मध्य प्रदेशातील मजूर होते आणि ते कामासाठी तेलंगणातील करीमनगर येथे जात होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
हा भीषण अपघात सोमवारी रात्री जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 4 किमी अंतरावर असलेल्या नागरा गावाजवळ घडला, अशी माहिती गोंदिया ग्रामीण पोलिसांचे निरीक्षक वैभव पवार यांनी दिली.
गोंदिया येथील रहिवासी असलेला ट्रक चालक मोहसीन खान (32) याने समोरून येणाऱ्या एसयूव्हीला धडक दिली, असे त्यांनी सांगितले.
सहा जणांचा मृत्यू
पवार यांनी सांगितले की, चक्काचूर झालेल्या वाहनातून पीडितांना बाहेर काढण्यात आले, या भीषण धडकेमुळे सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
किरण संतोष वैद्य (26), संतोष मात्रे (38), सुशीला मात्रे (35), रूपसेन तेजलाल सत्याकार (35), ज्योती रूपसेन सत्याकार (32) आणि तीन वर्षांचा आरुष मात्रे अशी मृतांची नावे असून हे सर्व मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर तहसिलचे रहिवासी आहेत.
ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 281 (बेदरकारपणे किंवा निष्काळजीपणाने वाहन चालवणे) आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
