सातारा. Mahalaxmi Express Robbery: मुंबईहून कोल्हापूरला जात असलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये सिंग्नल यंत्रणा बंद पाडून चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातारा जिल्ह्यातील सालपे स्थानकाजवळ पाच ते सहा जणांच्या टोळक्याने मध्यरात्रीच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड करून रेल्वे थांबवली. त्यानंतर चोरट्यांनी खिडकीतून  हात घालून आरक्षित डब्यातील झोपलेल्या तीन महिला प्रवाशांच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावले.

सालपे स्थानकाजवळ रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास महालक्ष्मी एक्स्प्रेस आली असता चोरट्यांनी सिग्नलची वायर कापून यंत्रणेत बिघाड केला. यानंतर पाच ते सहा जणांच्या टोळीने महिला प्रवाशांना लक्ष्य करत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले. महिला कोल्हापूर येथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी निघाल्या होत्या. 

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावल्यानंतर चोरांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले. कोणी पाठलाग करून नये म्हणून पळून जाताना चोरट्यांनी एस-2, एस-3 आणि एस-5 या डब्यांवर दगडफेक केली. अचानक झालेल्या या प्रकाराने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी मिरज रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पाच दरोडेखोर होत. त्यातील दोघांनी सिग्नलमध्ये बिघाड केला आणि तिघांनी रेल्वेच्या डब्यात शिरून महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावले. चोरच्यांनी महालक्ष्मी एक्स्प्रेस 15 मिनिटे रोखून धरली होती. पहाटे सव्वापाच वाजेपर्यंत रेल्वे प्रशासनाने सिग्नल यंत्रणा पूर्ववत केली व गाडी पुढे मार्गस्त झाली.