कोल्हापूर- Gokul Election Shaumika mahadik Result 2026: गोकुळ'मध्ये महायुतीच्या अक्राळ-विक्राळ निवडणूक यंत्रणेला पराभूत करत काँग्रेसचे नेते सतेज पाटील सर्वांना पुरून उरले आहेत. सतेज पाटील यांची समविचार आघाडीला 14 जागां मिळाल्या असून महायुतीच्या वाट्याला केवळ 11 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, महिला प्रतिनिधी गटातील लढतीकडे लक्ष लागलेल्या लढतीत महायुतीच्या शौमिका महाडिक पराभूत झाल्या आहेत. या निकालाने गोकुळवर अनेक वर्षे वर्चस्व असलेल्या महाडिक कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे.
गोकुळच्या निवडणुकीत महिला प्रतिनिधी गटातील लढतीत सतेज पाटील पॅनेलच्या अंजना रेडेकर यांनी महायुतीच्या शौमिका महाडिक यांचा पराभव केला आहे. शौमिका महाडिकांचा पराभव हा महाडिक कुंटुंबासाठी मोठा धक्का आहे. दरम्यान शौमिका महाडिकांनी फेरमोजणीची मागणी केली असून काही वेळानंतर अंतिम चित्र सप्ष्ट होणार आहे. शौमिका महाडिक यांचा 7 मतांनी पराभव झाला आहेे.
महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीकडून शौमिका अमल महाडिक उमेदवार होत्या, त्यांच्याविरुद्ध काँग्रेसप्रणित सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या अंजना रेडेकर उमेदवार होत्या. येथे 100 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आज आलेल्या निकालात शौमिका महाडिक यांचा 7 मतांनी पराभव झाला आहे.
तीन माजी अध्यक्ष पराभूत -
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला. संघाचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, विश्वास पाटील आणि नाविद मुश्रीफ यांचा पराभव हा महायुतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यातच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडिक यांनाही पराभवाचा सामना करावा लागल्याने महायुतीच्या गोटात खळबळ उडाली आहे.
तीन मंत्री, दोन खासदार व 10 आमदार प्रचाराला -
गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुतीने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. कोल्हापूर जिल्ह्यामधील तब्बल तीन कॅबिनेट मंत्री, दहा आमदार आणि दोन खासदार अशी दिग्गजांची फौज मैदानात उतरली होती. प्रशासन व सरकारची ताकद होती. मात्र सर्वांना पुरून उरत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी काँग्रेस प्रणित आघाडीने गोकुळच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा धुव्वा उडवला. मतदारांनीही महायुतीला स्पष्ट नाकारले आहे.
कोण आहेत शौमिका महाडिक-
शौमिका महाडिक या भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक हे त्यांचे सासरे तर भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे त्यांचे दीर आहेत. शौमिका महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं आहे. त्या जिल्हा परिषद सदस्यही होत्या. याशिवाय शौमिका महाडिक भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत. 2022 मध्ये गोकुळ निवडणुकीत शौमिका महाडिक 43 मतांनी विजयी झाल्या होत्या.
