Gokul Election Result 2026 : संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोल्हापूरच्या राजकारणात मानाचं स्थान असलेल्या गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने ऐतिहासिक मुसंडी मारत बहुमताचा आकडा गाठला आहे. एकूण २५ जागांपैकी सतेज पाटील यांच्या पॅनलने १४ जागांवर आघाडी घेत बहुमताचा ‘मॅजिक फिगर’ गाठली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीचे उमेदवार फक्त ११ जागांवर आघाडी घेऊन आहेत.
बहुमतासाठी १४ जागा आवश्यक-
गोकुळमधील 25 पैकी 14 चा आकडा हा बहुमताचा आकडा आहे. आणि सतेज पाटील यांचे उमेदवार तेवढ्याच जागांवर आघाडीवर आहेत, तर महायुतीचे 11 उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुतीच्या पॅनलेला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. हीच आघाडी शेवटपर्यंत आता कायम राहिल्यास सतेज पाटील यांची गोकुळमध्ये एकहाती सत्ता स्थापन होऊ शकते.
महायुतीच्या नेत्यांच्या धमक्या ठरल्या फोल -
महायुतीकडून ठरावधारकांना शेवटच्या टप्प्यापर्यंत धमकावण्याचा प्रयत्न झाला होता. इतकेच नव्हे तर त्यांना यल्लामा देवीच्या परडी, भंडारावर हात मारायला लावले होते. आम्हालाच मतदान करा, आम्हाला मतदान नाही केलं तर देवीचा कोप होईल. इतकेच नव्हे तर बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेनस्ट्रोक होईल, इतक्यापर्यंत धमकावण्याचे प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून झाले होते. मात्र, गोकुळ दूध उत्पादकांच्या मनात वेगळंच काहीतरी असल्याचं आज गोकुळच्या निकालातून दिसून आलं आहे.
महायुतीच्या नेत्यांची 25-0 ची हवा मतदारांनी काढली -
मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गोकुळच्या निवडणुकीत महायुती सर्वच्या सर्व जागा (25) जिंकेल असा दावा केला होता. या महायुतीचे सर्व नेते तोंडावर पडले असल्याची चर्चा आता कोल्हापुरसह राजकीय वर्तुळात सुरू आहे.
जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) निवडणुकीत महायुतीला आणि विशेष करून मंत्री हसन मुश्रीफ यांना अत्यंत मोठा राजकीय धक्का बसला आहे. निवडणुकीच्या मतमोजणीत 'गोकुळ'चे विद्यमान अध्यक्ष आणि हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांचा पराभव झाला आहे. इतर मागासवर्गीय (OBC) गटातून आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत खोत यांनी नविद मुश्रीफ यांचा पराभव केला आहे.
