एजन्सी, ठाणे: शिवसेना (उबाठा) चे माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी बुधवारी ठाण्यात पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यातील माजी आमदारांचे पक्षात स्वागत करताना शिंदे म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वामुळे आदिवासी समाजाच्या विकासाचे काम पुढे नेण्यास मदत होईल, असे येथील शिवसेना कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
टारफे यांच्यासोबत हिंगोलीतील शिवसेना (उबाठा) चे इतर काही पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला, असे यात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करताना, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांची शिवसेना ही सर्वसामान्यांच्या आणि समाजाच्या विकासासाठी काम करणारी संघटना असल्याचे सांगितले. डॉ. संतोष टारफे हे आदिवासी समाजाचे नेतृत्व करत असून, त्यांच्या माध्यमातून या समाजाच्या उन्नतीसाठी अधिक व्यापक काम करण्याची संधी मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
"तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत आला आहात. समाजाचे काम करा, शिवसेनेचे काम करा. तुमच्या विकासकामांसाठी आणि सामाजिक उन्नतीसाठी शिवसेना कायम तुमच्या पाठीशी उभी राहील. तुम्हाला कोणतीही कमतरता भासू देणार नाही," अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली.
हिंगोली जिल्ह्यातील विकासकामांचा संदर्भ देताना शिंदे यांनी आमदार संतोष बांगर यांच्या माध्यमातून यापूर्वी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याचे नमूद केले. यापुढेही या भागातील अपूर्ण विकासकामे, आवश्यक पायाभूत सुविधा आणि आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
संतोष टारफे यांच्या या पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची जिल्ह्यात पुन्हा एकदा ताकद वाढणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा मोठा फायदा पक्षाला होणार असल्याचे सांगितले जात आहे.
टारफे यांच्यासह एस पी राठोड,रमेश जाधव, सखाराम उबाळे , दुर्गे पाटील यांच्या सह शेकडो कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
