जेएनएन, पुणे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज, पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.
माहितीनुसार, वातावरणातील बदलामुळे शरद पवार यांना छातीत कफ झाल्याचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते.
डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांची प्रकृती समाधानकारक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बुधवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टरांनी यापूर्वीच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिली होती. तसेच छातीत जाणवणारी वेदनाही कमी झाल्याचे सांगितले होते.
दरम्यान, शरद पवार यांना घरी घेऊन जाण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झाल्या होत्या. वडिलांच्या प्रकृतीची त्या सातत्याने माहिती घेत होत्या. यापूर्वीही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट केले होते. त्यांच्या सर्व आरोग्यविषयक चाचण्यांचे पॅरामीटर्स स्थिर असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
2 दिवस विश्रांतीचा सल्ला
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी डॉक्टरांनी शरद पवार यांना आणखी दोन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस त्यांनी धावपळ आणि दगदग टाळण्याची आवश्यकता आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार आणि विश्रांती घेण्यावर भर दिला जाणार आहे.
शरद पवार यांच्या रुग्णालयात दाखल होण्याच्या बातमीनंतर राज्यभरातील राजकीय नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत विचारणा केली जात होती. आता त्यांना डिस्चार्ज मिळाल्याने समर्थकांना दिलासा मिळाला आहे.
