सातारा - कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातला. साताऱ्यातील कराड शहराजवळ पुणे- बेंगलोर महामार्गावरील उड्डाणपूलावर मंगळवारी  रात्री 11 वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात साताऱ्यातील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला.  तर तीन जण जखमी झाले आहेत. सर्वजण कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला गेले होते. मात्र त्यांचं हे देवदर्शन अखेरचंच ठरलं.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील सर्व तरुण साताऱ्यातील असून ते दसऱ्यानिमित्त कोल्हापूरच्या महालक्ष्मी दर्शनाला गेले होते. त्यानंतर घरी परत येत असताना हा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने पाठीमागून या तरुणांलाच्या कारला धडक दिली. सातारा जिल्ह्यातील कराड शहराजवळ पुणे-बेंगलोर महामार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या सहापदरी उड्डाणपूलावर हा अपघात झाला. काही दिवसांपूर्वीच हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यात आला होता. अपघातातील सर्व तरुण साताऱ्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव गावचे रहिवासी आहेत.

स्कॉर्पिओ कारचा चक्काचूर -

हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. सीटवर रक्ताचा सडा पडला. यात चार जणांनी जागीच प्राण सोडला. जखमींवर कराडच्या कृष्णा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे कातरखटाव गावावर शोककळा पसरला आहे. तेजस देशमुख (चालक, वय 25 वर्षे), सागर निंबाळकर (वय 23 वर्षे), सुयश चिंचकर (वय 20 वर्षे) आणि रोहित धोत्रे (वय 21 वर्षे) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.  तर ऋतुराज दुबळे (वय 21 वर्षे), शंतनू शिंगाडे (वय 20 वर्षे) आणि अमन तांबोळी (वय 23 वर्षे) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.