जेएनएन, मुंबई. राज्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यामध्ये जून ते आज पर्यंत या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीबाबत दुष्काळाबाबतच्या Trigger- 1 (प्रथम कळ) अनुषंगाने पंचनामे करण्यात येणार आहेत. सर्व्हेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शवणारे छायाचित्र व जीपीएस कोऑडीनेट संकलन करून पिक परिस्थितीचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. 

265 तालुक्यात दुष्काळ जाहीर

  • ठाणे महसूल विभागातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर व राजापूर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड व वेंगुर्ला या तालुक्यांना प्रथम कळ लागू झाली आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्याचा यामध्ये समावेश नाही. 
  • नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील एकूण 49 तालुक्यांचा, तर पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील 35 तालुक्यांचा समावेश आहे. 
  • छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांतील 74 तालुक्यांना प्रथम कळ लागू झाली आहे. 
  • अमरावती विभागातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांतील 56 तालुक्यांचा, तर नागपूर विभागातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील ३९ तालुक्यांचा समावेश आहे. 

उपाययोजना व सवलती लागू 

दुष्काळग्रस्त भागात विशेष बाब म्हणून उपाययोजना व सवलती लागू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये..

  • जमीन महसूलात सूट, 
  • पिक कर्जाचे पुनर्गठन,
  • शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती,
  • कृषी पंपाच्या चालू विजबिलात सूट (7.5 हॉर्सपावर पर्यंत क्षमतेच्या विजपंपाचे वीज बिल अगोदरच माफ करण्यात आले आहे. 
  • त्यावरील वीज पंपांना सदर सूट लागू असेल), 
  • शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी,
  • रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरु करणे, 
  • आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, 
  • टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज खंडीत केली जाणार नाही, 
  • शेतीवर अवलंबून शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी अन्न धान्याचा पुरेसा पुरवठा, टंचाई होणार नाही याबाबत व्यवस्था उभी करणे, 
  • जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध होईल याची व्यवस्था करणे, 
  • जलसंधारणाची कामे सुरु करणे, 
  • अगोदरच निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णयाप्रमाणे पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करणे या उपाययोजनांचा समावेश आहे.

हेही वाचा - Drought Declared Talukas list: राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, वाचा सविस्तर यादी