जेएनएन, मुंबई. राज्यभरात लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात येत असतानाच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आले आहे.
265 तालुक्यांचा आकडा अधिकृत शासन निर्णयात कायम राहिला आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे 74 टक्के तालुके दुष्काळाच्या कक्षेत आले आहेत. त्यामुळे मोठ्या दुष्काळाची तीव्रतेचा दिसून येत आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने मोठी ओढ दिली आहे. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, ज्वारी यांसह विविध खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी उभी पिके करपल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्र्यांना तसेच प्रशासनाला निर्देश दिले होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनीही दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. वाशिमसह विदर्भातील भागांची पाहणी करताना पिकांची परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले होते. दुष्काळ संहितेतील ट्रिगर-1 अंतर्गत मदत देण्यासाठी शासन निर्णय काढला जाणार असल्याची माहितीही त्यांनी यापूर्वी दिली होती.
दरम्यान, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडूनही सातत्याने करण्यात येत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. शेतकरी, शेतमजूर, पशुधन आणि ग्रामीण भागासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली होती.
दुष्काळ जाहीर झाल्यानंतर संबंधित भागांमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीक नुकसान भरपाई, कर्ज वसुलीवरील सवलती, वीजबिलासंदर्भातील उपाययोजना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चारा उपलब्धता आणि रोजगाराच्या उपाययोजना अशा विविध सवलती लागू होणार आहे. दुष्काळी मदतीचे स्वरूप आणि पात्रता शासनाच्या स्वतंत्र आदेशातून स्पष्ट केली जाणार आहे. दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रक्रियेत पर्जन्यमान, पावसातील खंड, पेरणी क्षेत्र, वनस्पती निर्देशांक, जमिनीतील आर्द्रता आणि प्रत्यक्ष पीक नुकसान यांसारख्या निकषांचा विचार केला गेला आहे.
दरम्यान, सरकारकडून दुष्काळग्रस्त भागातील पंचनामे आणि नुकसानीची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. केंद्र सरकारकडून मदत मिळण्याची प्रक्रिया स्वतंत्रपणे सुरू राहणार असली, तरी राज्य सरकार स्वतःच्या तिजोरीतूनही शेतकऱ्यांना तातडीची मदत देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे आता 265 तालुक्यांचा समावेश असलेल्या अधिकृत शासन निर्णयाची प्रत आणि तालुकानिहाय यादी जाहीर होणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यातील किती तालुके दुष्काळाच्या कक्षेत आले आहेत आणि शेतकऱ्यांना नेमकी कोणती मदत मिळणार, हे स्पष्ट होईल.
हेही वाचा - Lalbaugcha Raja Visarjan: लालबागचा राजा चे खोल समुद्रात विसर्जन संपन्न; भावूक निरोप देतानाचे Photos
महत्त्वाचे मुद्दे
- राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर
- ट्रिगर 1 लागू झालेल्या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर
- राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळ, याचा अर्थ 75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर
- दुष्काळाच्या विविध उपाययोजना जाहीर
- जमीन महसुलात सूट
- पीक कर्जाचे पुनर्गठन
- शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती
- कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सूट
(7.5 हॉर्सपॉवर क्षमतेच्या वीजपंपांचे वीज बिल आधीच माफ, आता त्यावरील वीजपंपांनाही सूट) - शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी
- रोजगार हमी योजना अंतर्गत नियमात शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरु करणार
- आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे टँकर्स
- टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्यांच्या शेतीपंपाची वीजजोडणी खंडित होणार नाही
- शेतीवर आश्रित शेतकरी/शेतमजूर यांना अन्नधान्य पुरवणार
- जनावरांच्या चार्याची व्यवस्था करणार
- जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेणार
- पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी यासाठी आधीच्या आदेशाप्रमाणे नियोजन सुरुच ठेवणार
- पंचनाम्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याचे सर्व जिल्हाधिकार्यांना आदेश
- पिकांची स्थिती दाखवणारे छायाचित्र, जीपीएस संकलित करण्याचे आदेश
हेही वाचा - राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; पुढील 24 तास महत्त्वाचे, विदर्भात अलर्ट जारी
