जेएनएन, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.या भेटीमुळे पवार काका–पुतण्यामधील राजकीय दुरावा कमी होण्याचे संकेत मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या भेटीपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुंबईतील एका बंगल्यावर अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे .या सलग भेटींमुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गटांमध्ये संवादाची प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. माहितीनुसार, या चर्चांचा केंद्रबिंदू पक्षाची पुढील दिशा, संघटनात्मक मजबुती आणि भविष्यातील राजकीय समीकरणे हाच आहे.
माहितीनुसार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतची सर्व महत्त्वाची चर्चा दिल्लीत पार पडली आहे. अजित पवार यांनी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य विलिनीकरणाबाबत सविस्तर चर्चा केल्याचे समजते. यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील अंतर्गत मतभेद, सत्तेतील भूमिका आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याची चर्चा अधिक महत्त्वाची मानली जात आहे. पवार कुटुंबातील संवाद वाढल्यास कार्यकर्त्यांमध्येही सकारात्मक संदेश जात असल्याचे चित्र आहे.
दरम्यान या सर्व घडामोडींवर अद्याप कोणत्याही गटाकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, काका–पुतण्याच्या भेटी आणि दिल्लीत सुरू असलेल्या हालचाली पाहता राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय एकत्रिकरणाचा मार्ग मोकळा होतो की नाही, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: Mahayuti Seat Sharing : महायुतीत जागावाटपावरून गुंता; शिंदे सेनेच्या 100 जागांची मागणी भाजपने धुडकावली, तर इतक्या जागा देण्याची तयारी
