कोल्हापूर. Zilla Parishad Election 2026 : कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत संपली आहे.अपेक्षेपेक्षा कमी उमेदवारांनी माघार घेतल्याचं चित्र आहे. अनेक गटांमध्ये तगडे तसेच बंडखोरी केलेले उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत ठाम राहिल्यामुळे आता जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमध्ये अटीतटीच्या लढती होणार हे स्पष्ट झालं आहे.
अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजकीय हालचालींना मोठा वेग आला होता. लोकप्रतिनिधी, प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. अनेक ठिकाणी बैठका, फोनाफोनी, समेटाचे प्रयत्न सुरू होते. मात्र, या प्रयत्नांना फारसं यश मिळालं नाही. अनेक उमेदवारांनी माघारीचा प्रस्ताव धुडकावून लावत आपले अर्ज कायम ठेवले.
यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी थेट दुरंगी, तर अनेक मतदारसंघात तिरंगी आणि चौरंगी लढती रंगणार आहेत. विशेषतः काही संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या गटांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांसोबतच बंडखोर उमेदवार रिंगणात असल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम निकालांवर होणार असून, अनेक ठिकाणी कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
मोजक्याच उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे यंदाची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. बंडखोरीमुळे पक्षांची डोकेदुखी वाढली असून, अधिकृत उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
दरम्यान, अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता निवडणूक प्रचाराला जोर येणार आहे. येत्या काही दिवसांत प्रचारसभा, रोड शो, बैठका यामध्ये वाढ होणार असून, प्रत्येक पक्ष आणि उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापणार असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक रंगतदार होण्याचे संकेत मिळत आहेत.
