मुंबई. मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत भाजप आणि शिवसेना (महायुती) अधिकृत गट स्थापन करण्याची शक्यता आहे. गट स्थापन झाल्यानंतर महापौर निवड, उपमहापौर निवड तसेच स्थायी समितीसह इतर महत्त्वाच्या समित्यांची रचना करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

पालिका नियमांनुसार गट स्थापन झाल्यानंतर सात दिवसांच्या आत महापौर निवडीसह सत्तास्थापनेच्या औपचारिक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे येत्या आठवडाभरात मुंबईला नवा महापौर मिळण्याची दाट शक्यता आहे.

गट स्थापन केल्यानंतर काय प्रक्रिया?

महानगरपालिकेत प्रथम सर्व पक्षांकडून अधिकृत गटनेत्यांची नियुक्ती केली जाते. त्यानंतर महापौरपदासाठी अर्ज मागवले जातात. सभागृहात बहुमत सिद्ध करत महापौर आणि उपमहापौर निवडले जातात. त्यानंतर स्थायी समिती, शिक्षण समिती, सुधार समितीसारख्या महत्त्वाच्या समित्यांची स्थापना केली जाते. या समित्यांमधूनच मुंबईच्या कारभाराचे मुख्य निर्णय घेतले जातात.

सत्ता स्थापनेचे संकेत स्पष्ट-

भाजप-शिवसेना महायुतीकडे बहुमत असल्यामुळे सत्तास्थापनेचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. मात्र महापौरपद कोणाकडे जाणार, उपमहापौरपदाची विभागणी कशी होणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

    मुंबईकरांचे लक्ष महापौर निवडीकडे-

    मुंबईकरांचे लक्ष आता नवीन महापौरावर आणि प्रशासनावर केंद्रित झाले आहे. पाणीपुरवठा, रस्ते, झोपडपट्टी पुनर्विकास, आरोग्य व्यवस्था, पावसाळी नियोजन, वाहतूक कोंडी असे अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे महापौर कोण होणार आणि कोणता अजेंडा पुढे नेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.