सातारा. Satara Accident News: साताऱ्यातील यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीने  गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे. दसऱ्यानिमित्त कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना कार व ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात जिवलग मित्राचा मृत्यू झाल्याने जबर मानसिक धक्का बसल्याने या विद्यार्थिनीने आपले आयुष्य संपवल्याचे सांगितले जात आहे. पूजा माने असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, ती खटाव तालुक्यातील मानेवाडी येथील रहिवासी होती. या घटनेमुळे शैक्षणिक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पूजाने वसतीगृहात गळफास घेऊन जीवन का संपवलं याचा तपास सुरू आहे. पूजाच्या आत्महत्या करण्यामागे मित्राचा मृत्यू की अन्य कोणते कारण आहे, याचा तपास केला जात आहे. आकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांनी केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दसऱ्यानिमित्त कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी गेलेले काही तरुण दर्शन आटोपून स्कॉर्पिओ गाडीतून परतत होते. मंगळवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास कराडजवळ पुणे-बंगळूर महामार्गावरील उड्डाणपुलावर त्यांच्या कारला पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली होती. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा पार चक्काचूर झाला व सीटवर रक्ताचा सडा पडला. या अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले.

या दुर्घटनेत पूजाच्या जवळच्या मित्राचाही मृत्यू झाला होता. या घटनेचा पूजाच्या मनावर खोल परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर साताऱ्यातील यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या वसतिगृहात तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. 

कराडजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे तेजस देशमुख (25), सागर निंबाळकर (23), सुयश चिंचकर (20) आणि रोहित धोत्रे (21) अशी आहेत. तर ऋतुराज दुबळे (21), शंतनू शिंगाडे (20) आणि अमन तांबोळी (23) हे तिघे जखमी झाले होते.

या दोन्ही घटनांची नोंद पोलिसांत करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या दोन दुर्घटनांमुळे संबंधित कुटुंबांवर ऐन सणासुदीत दुःखाचा डोंगर कोसळला आहे.