जेएनएन, छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड परिसरात 6 ते 7 जणांच्या टोळक्याने दोन वाहनांवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. या दगडफेकीत दोन्ही वाहनांच्या काचा फुटल्या असून, अचानक झालेल्या हल्ल्यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी याच महामार्गावर भरदिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून एका अभियंत्याला लुटल्याची घटना घडली होती. त्यामुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे.

माहितीनुसार, करमाड परिसरातून दोन वाहने प्रवास करत असताना 6 ते 7 जणांच्या टोळक्याने अचानक त्यांच्यावर दगडफेक सुरू केली. ही दोन्ही वाहने नागपूर आणि वाशिमच्या दिशेने जात होती. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे वाहनचालकांना काही समजण्यापूर्वीच वाहनांच्या काचा फुटल्या. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. 

दगडफेकीची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलीस पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत दगडफेक करणारे संशयित पसार झाले होते. त्यामुळे पोलिसांच्या हाती तातडीने कोणताही आरोपी लागला नाही. या प्रकरणी पोलिसांकडून संबंधित परिसराची पाहणी करून दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

दोन दिवसांपूर्वी अभियंत्याला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले 

समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणारी ही पहिलीच घटना नाही. अवघ्या दोन दिवसांपूर्वी, 2 नोव्हेंबर रोजी समृद्धी महामार्गावर भरदिवसा एका सरकारी अभियंत्याला पिस्तुलाचा आणि चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले होते. मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता फरीद खान हे चालकासह इनोव्हा कारने मुंबईच्या दिशेने जात होते. त्यावेळी शहापूर परिसरात एका अर्टिगा कारने त्यांची गाडी अडवली. त्यानंतर मास्क घातलेल्या हल्लेखोरांनी पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील रोकड, मोबाइल आणि इनोव्हा कार लुटून नेली होती.

या प्रकरणात पोलिसांनी वेगाने तपास करत मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. 

    प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर 

    नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर सातत्याने दगडफेक, लूटमार आणि वाहनचालकांना लक्ष्य करण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. महामार्गावर पोलिसांची गस्त, संशयित हालचालींवर लक्ष आणि संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी प्रवाशांकडून होण्याची शक्यता आहे. 

    दरम्यान, करमाड परिसरातील ताज्या दगडफेकीच्या घटनेतील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.