एजन्सी, छत्रपती संभाजीनगर: Ujjwal Nikam On Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडमधील न्यायालयात सुनावणी सुरु आहे. आज पहिल्यांदाच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात भूमिका मांडली. यावेळी न्यायालयात सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील प्राथमिक तथ्ये, ज्यात खुनामागील हेतूचाही समावेश आहे, सादर केली, असं ते म्हणाले. आरोप निश्चित करण्यासाठी 10 एप्रिल रोजी अर्ज दाखल केला जाईल, असंही सांगितलं.

8 जणांना अटक, एक जण फरार

बीड जिल्ह्यातील मासाजोग गावचे सरपंच देशमुख यांचे गेल्या वर्षी 9 डिसेंबर रोजी एका ऊर्जा कंपनीला खंडणी देण्याच्या प्रयत्नाला विरोध केल्यामुळे कथितरित्या अपहरण करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत माजी महाराष्ट्र मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी कृष्णा आंधळे फरारी 

अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींमध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, सुधीर संगळे, प्रतीक घुले आणि सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे. या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे फरारी आहे. सरपंच खून प्रकरणातील आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले.

    "आज न्यायालयात संतोष देशमुख खून प्रकरणातील तथ्ये आणि खुनामागील हेतू सादर करण्यात आला. तसेच, प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे आरोपींच्या वकिलांनाही सोपवण्यात आली," असे निकम म्हणाले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे.

    सुनावणीनंतर पीटीआयशी बोलताना निकम म्हणाले, "आज मी सरकारी पक्षाच्या वतीने केस ठेवली. मी न्यायालयाला घटनेचा क्रम आणि खुनामागील गुन्हेगारी कट (षडयंत्र) याबद्दल माहिती दिली. सरपंचाच्या हत्येमागचा (खंडणीचा) हेतू न्यायालयाला सांगितला. आम्ही न्यायालयात हे देखील सांगितले की, सादर केलेल्या प्रत्येक तथ्यासाठी आमच्याकडे पुरावे आहेत. ही केस परिस्थितीजन्य, कागदोपत्री आणि वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित आहे... आम्ही साक्षीदारांची ओळख गुप्त ठेवण्याची विनंती करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे, ते म्हणाले.

    आरोपी सुदर्शन घुले हे मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून काम करत होते, असेही न्यायालयात सांगण्यात आले, असे ते म्हणाले. सरकारी पक्षाने न्यायालयात आवाडा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धमक्या देणारे ऑडिओ रेकॉर्डिंगही सादर केले, असे ते म्हणाले. आरोपींनी त्यांच्या वकिलांमार्फत मागितलेली कागदपत्रेही सादर करण्यात आली, असे निकम म्हणाले.

    दरम्यान, मृत सरपंचाचे बंधू धनंजय देशमुख यांनी सुनावणीपूर्वी निकम यांची भेट घेतली.