बीड. Santosh Deshmukh Murder Case : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बहुचर्चित आणि हायप्रोफाइल प्रकरणात वाल्मिक कराडसह त्याच्या टोळीतील सर्व आरोपींवर न्यायालयाने अधिकृतपणे आरोप निश्चित केले आहेत. लोक न्यायालयात झालेल्या हायव्होल्टेज सुनावणीनंतर ही माहिती ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

पुढील सुनावणी 8 जानेवारी 2026 रोजी

आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जानेवारी 2026 रोजी होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष साक्षीदारांची उलटतपासणी सुरू होणार आहे. त्यामुळे या खटल्याने निर्णायक टप्प्यात प्रवेश केल्याचे मानले जात आहे.

खंडणी व्यवहारातूनच हत्येचा कट-

यावेळी माध्यमांशी बोलताना ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हत्या प्रकरणामागील संपूर्ण कटाचा उलगडा केला. त्यांनी सांगितले की, आरोपी वाल्मिक कराड हा अवादा कंपनीकडून खंडणी मागत होता. या खंडणी व्यवहारात सरपंच संतोष देशमुख अडथळा ठरत होते. देशमुख यांनी या गैरप्रकाराला ठाम विरोध केला होता.

याच रागातून आणि सूडभावनेतून आरोपींनी संतोष देशमुख यांचे अपहरण केले, त्यांना टाकळी शिवारात नेऊन निर्घृणपणे खून केला, असा आरोप सरकारी पक्षाने न्यायालयात मांडला.

    हत्येनंतर व्हिडिओ, फोटो काढून आनंद साजरा-

    या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी हत्या केल्यानंतर संतोष देशमुख यांच्या मृतदेहाचे व्हिडिओ आणि तब्बल 8 फोटो काढले. एवढेच नव्हे, तर या कृत्यानंतर आरोपींनी आनंद साजरा केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

    उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, हे व्हिडिओ आणि फोटो आरोपींकडून त्यांच्या वकिलांना देण्यात आले आहेत. हेच व्हिडिओ या खटल्यातील सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक पुरावा ठरणार आहेत.

    1800 पानांचे दोषारोपपत्र; आरोपींनी आरोप नाकारले

    या सुनावणीदरम्यान न्यायालयाने 1800 पानांच्या दोषारोपपत्रातील संपूर्ण घटनाक्रम आरोपींना वाचून दाखवला. त्यानंतर न्यायाधीशांनी सर्व आरोपींना, तुमच्यावर लावलेले आरोप मान्य आहेत का?” असा थेट सवाल केला.

    यावर वाल्मिक कराडसह सर्व सहा आरोपींनी आरोप मान्य नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे आता प्रकरणाची सुनावणी साक्षीदार, पुरावे आणि उलटतपासणीच्या टप्प्याकडे जाणार आहे.

    पुढील टप्प्यात साक्षीदारांच्या जबाबांकडे लक्ष!

    या खटल्यात अनेक महत्त्वाचे साक्षीदार, तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल डेटा सादर केला जाणार आहे. विशेषतः व्हिडिओ आणि फोटो पुरावे खटल्याची दिशा ठरविणारे आहे.