जेएनएन, मुंबई: महापालिका निवडणुकीत मुंबईचा डॉन अरुण गवळी यांच्या कन्या गीता गवळी आणि योगिता गवळी यांनी निवडणूक रिंगणात उतरत आपली ताकद दाखवली आहे. दोघींनीही अखिल भारतीय सेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
गीता गवळी यांनी प्रभाग क्रमांक 212 मधून तर योगिता गवळी यांनी प्रभाग क्रमांक 207 मधून आपले नामनिर्देशन दाखल केले आहे. गीता गवळी या माजी नगरसेवक असून त्या यापूर्वी सलग निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे अनुभवी नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. दुसरीकडे, योगिता गवळी या पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या असून, त्यांच्यासाठी ही निवडणूक राजकीय पदार्पण ठरणार आहे.
दरम्यान, अरुण गवळी यांच्या भावजयी वंदना गवळी यांनी शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश केल्याने, संबंधित प्रभागातील समीकरण बदलले आहे. त्यामुळे ती जागा आता योगिता गवळी लढवणार असल्याची चर्चा आधीपासूनच सुरू होती, त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेला वेग आला असून, 23 डिसेंबर रोजी एकूण 4 हजार 165 उमेदवारी अर्जांचे वितरण झाले होते. त्यानंतर २४ डिसेंबर रोजी शहरातील २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण 2 हजार 844 अर्जांचे वितरण करण्यात आले होते. त्या दिवशी 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
नामनिर्देशन पत्रांच्या वितरणाच्या तिसऱ्या दिवशी, शुक्रवारी, आणखी 2 हजार 40 उमेदवारी अर्जांचे वितरण झाले असून 7 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.
गवळी कुटुंबीयांच्या उमेदवारीमुळे संबंधित प्रभागांमध्ये निवडणुकीचा रंग चढू लागला आहे. विशेषतः गीता गवळी यांचा अनुभव आणि योगिता गवळी यांचे नवखे नेतृत्व मतदारांमध्ये किती प्रभाव टाकते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आगामी काळात उमेदवारी अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता असून, या दोन्ही प्रभागांमध्ये लढत अधिक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
हेही वाचा: BMC Election 2026: महायुतीचा मुंबईतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला; 227 जागांवर एकमत
