जेएनएन, जालना. जिल्ह्यातील रामनगर परिसरात गॅसच्या गोडाऊनवर धाडसी चोरीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 110 भरलेले गॅस सिलिंडर लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना 14 ते 16 मार्चदरम्यान रात्रीच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे.

माहितीनुसार, आनंद भारत गॅस गोडाऊन येथे चोरट्यांनी गोडाऊनचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने मोठ्या प्रमाणावर सिलिंडर चोरी केले. चोरीस गेलेल्या सिलिंडरमध्ये 14 किलो वजनाचे 96, 5 किलो वजनाचे 2 आणि 19 किलो वजनाचे 12 सिलिंडरांचा समावेश आहे.

या चोरीत एकूण 4 लाख 51 हजार 543 रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी फिर्यादी सिद्धार्थ आढाव यांनी दिलेल्या माहितीनुसार मौजपुरी पोलिस ठाणे येथे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, या गोडाऊनमध्ये यापूर्वीही सिलिंडर चोरीच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सध्या राज्यात गॅस टंचाईची परिस्थिती असताना इतक्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

    या घटनेमुळे स्थानिक प्रशासन आणि गॅस वितरकांमध्येही खळबळ उडाली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.