जेएनएन, छत्रपती संभाजीनगर: लग्नासाठी दबाव टाकणे आणि बदनामी करण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याच्या आरोपातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गणेश शंकर शेंडगे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

आयफोन भेट दिल्यानंतर लग्नासाठी दबाव टाकल्याचा आरोप 

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, आरोपीने तरुणीला आयफोन भेट दिला होता. त्यानंतर तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप आहे. माझ्यासोबत लग्न कर, अन्यथा बदनामी करीन आणि तुला कुठेही लग्न करू देणार नाही, अशा धमक्या आरोपी देत असल्याचा दावा तरुणीच्या वडिलांनी फिर्यादीत केला आहे.

या धमक्या आणि सातत्याने होणाऱ्या मानसिक त्रासामुळे तरुणी नैराश्यात होती, असेही तिच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. या त्रासाला कंटाळूनच तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

आई-वडील घरी परतले, तेव्हा घटना उघड

तक्रारीतील माहितीनुसार, 14 मे 2026 रोजी जोगेश्वरी येथील गणेशनगर परिसरात ही घटना घडली. तरुणीचे आई-वडील कामावरून घरी परतले असता घराची कडी बाहेरून लावलेली होती. दरवाजा उघडून आत गेल्यानंतर त्यांना मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

    कुटुंबीयांनी तिला तातडीने खाली उतरवून उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

    वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांत गुन्हा

    घटनेनंतर कुटुंबीयांनी तरुणीच्या मोबाईलसह इतर बाबींची माहिती घेतली. तिच्याकडे असलेला आयफोन आरोपीने दिल्याचे समोर आल्याचा उल्लेख वडिलांच्या तक्रारीत आहे. त्यानंतर लग्नासाठी दबाव, धमक्या आणि मानसिक त्रास दिल्याच्या आरोपांवरून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. 

    या तक्रारीच्या आधारे एमआयडीसी वाळूज पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरेश सांगळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.