एजन्सी, मुंबई: वसई-विरार परिसरातील इम्पेरिअल टॉवर (इम्पेरिअल हाईट्स) हायराईज इमारतीच्या 8 व्या ते 10 व्या मजल्यावर मंगळवारी रात्री भीषण आग लागली. ही घटना लिंक रोडवर असलेल्या या इमारतीत घडली, ज्यामध्ये शॉर्ट सर्किटची शंका व्यक्त केली जात आहे.

दोन महिलांचा मृत्यू

वसई-नालासोपारा लिंक रोडवरील इम्पिरियल हाइट्स (Imperial Heights) इमारतीत मध्यरात्रीच्या झालेल्या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून, अन्य सहा जणांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फाल्गुनी शाह (वय 50) आणि अश्विनी पारकर (वय 50) अशी मृत महिलांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले की, या घटनेची माहिती रात्री सुमारे 11:30 वाजता मिळाली. 

यानंतर अग्निशामक दल (फायर ब्रिगेड), पोलीस आणि प्रशासकीय पथकाने त्वरित बचाव कार्य सुरू केले. 15 जणांना सुरक्षित वाचवण्यात आले, तर अनेक जण स्वतःच खाली उतरून आले.

आग इतकी भीषण होती की अनेक लोक जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या बाहेरील भागाला लटकले. त्यांना क्रेनच्या मदतीने रेस्क्यू (बचाव) करण्यात आले.