छत्रपती संभाजीनगर:  नांदेड जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका शेतकरी कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांना संशय आहे की ही सामूहिक आत्महत्येची घटना आहे. गुरुवारी सकाळी घराच्या आत आई-वडिलांचे मृतदेह आणि जवळच्या रेल्वे रुळावर दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आल्यानंतर हा भयानक प्रकार समोर आला. 

ही घटना मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात घडली. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गावकरी घरात शिरले तेव्हा त्यांना 51 वर्षीय रमेश सोनाजी लाखे आणि त्यांची 45 वर्षीय पत्नी राधाबाई लाखे एका खाटेवर मृतावस्थेत पडलेले आढळले. त्यांचे मृतदेह एकत्र पडले होते. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, हे अद्याप अस्पष्ट आहे. दुसरीकडे, त्यांची दोन तरुण मुलं - उमेश आणि गोविंद यांनी गावाजवळून जाणाऱ्या रेल्वेखाली उडी घेऊन आपले आयुष्य संपवले. एकाच वेळी कुटुंबातील चारही जणांनी जीवन संपवल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

त्यानंतर, कुटुंबातील दोन मुले, 25 वर्षीय उमेश आणि 23 वर्षीय बजरंग यांचे मृतदेह रेल्वे रुळांवर आढळले. त्यांनी वेगाने येणाऱ्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

कारण अद्याप गुलदस्त्यात -

एका कुटूंबातील सर्वांच्या या सामूहिक आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. घरची हलाखीची परिस्थिती की आणखी काही कौटुंबिक कारणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले याचा तपास पोलीस करत आहेत.  घटनेचा उलगडा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मृतदेहांच्या स्थितीवरून असे दिसून येते की हे एका रात्रीत घडले आहे. संपूर्ण कुटुंब लहान शेतकऱ्यांचे होते जे त्यांच्या जमिनीच्या छोट्या तुकड्यावर काम करून उदरनिर्वाह करत होते.