जेएनएन, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी शासनाकडून 1500 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर झाला असला तरी, हा निधी मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने संबंधित बँकेत जाऊन 'केवायसी' (KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले आहे.

केवायसी शिवाय निधी नाही

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंचनामा पूर्ण झाल्यानंतर मदतीची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, खातेदारांनी ओळख पडताळणीसाठी केवायसी केली नाही, तर त्यांना निधी मिळणार नाही. यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे आणखी एक अडथळा उभा राहिला आहे.

मदतीत काय-काय मिळणार?

दरम्यान, तातडीच्या मदतीत पूरग्रस्तांना 3 किलो तूरडाळ देण्याचे आदेश आहेत. मात्र, जिल्हा पुरवठा विभागात सध्या तूरडाळ उपलब्ध नसल्याची कबुली जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली. गहू व तांदूळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू व 10 किलो तांदूळ दिले जातील. मात्र तूरडाळ खरेदीसाठी परवानगी मिळाल्यास स्थानिक पातळीवर लवकरच खरेदी करण्यात येईल अशी माहिती फुलारी यांनी दिली.

    बँकांची स्थितीही चिंताजनक 

    पूरग्रस्त भागातील बँकांची स्थितीही चिंताजनक आहे. नदीकाठच्या अनेक बँकांमध्ये वीजपुरवठा खंडित असून इंटरनेट सेवाही विस्कळीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी व मदतीची रक्कम मिळवण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. इंटरनेट सेवा खंडित असल्याबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसल्याचा दावा विभागीय आयुक्तांनी केला आहे. तरी, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. पूरानंतर आता मदतीच्या प्रक्रियेतच शेतकऱ्यांना अडथळे येऊ लागल्याने "शासनाकडून मिळणारी मदत नेमकी शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचणार?" असा प्रश्न उपस्थित होत आहे.