जेएनएन, नागपूर: धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या सुविधांची व्यवस्था आता अंतिम टप्प्यात असून राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीक्षाभूमीला भेट देत  आढावा घेतला. त्यांनी दीक्षाभूमी परिसरात  विविध नागरी सुविधांच्या व्यवस्थेची पाहणी केली तसेच पावसाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीने व्यवस्था कराव्या व इतर व्यवस्था चोख राखण्याचे निर्देश दिले.

येत्या 2 ऑक्टोबरला नागपूर शहरात दीक्षाभूमीवर 69 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा होणार आहे. यासाठी मंगळवार 30 सप्टेंबरपासून अनुयायांचे नागपूर नगरात आगमन सुरू होणार आहे. त्यांच्या राहण्याची, त्यांच्या विश्रांतीची तसेच त्यांना आवश्यक नागरी सुविधा पुरविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने दीक्षाभूमी, माता कचेरी, शासकीय आयटीआय, कारागृह परिसरात व्यवस्था केली आहे.  दीक्षाभूमी परिसरात व इतरत्र अनुयायांना त्रास होणार नाही, तसेच त्यांना नागरी सुविधा मिळाव्या यासाठी नागपूर जिल्हा प्रशासन व नागपूर महानगरपालिकेने संपूर्ण नागरी सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करावे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीने व्यवस्था करावी, अशा सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी केल्या.

 तर मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी परिसरात आवश्यक ठिकाणी वाटर प्रुफ शेडची व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगितले. तर पावसाचा त्रास होऊ नये यासाठी अहोरात्र कार्य सुरू ठेवावे, चिखलात चुरी टाकण्यात येत आहे. तसेच पावसाची शक्यात लक्षात घेता मनपाच्या शाळेत व्यवस्था करण्यात येणार आहे. मनपाद्वारे उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाचे आज मंगळवार 30 रोजी सकाळी 10.30 वाजता लोकार्पण करण्यात आले. 

अनुयायांसाठी अशी आहे व्यवस्था... 

  • दीक्षाभूमी परिसरालगतच्या रस्त्यावर 120 नळा द्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
  • सामाजिक संस्थेद्वारा देण्यात येणाऱ्या भोजनदानाच्या ठिकाणी 7 टँकरद्वारा पाणी पुरवठा  
  •  विविध ठिकाणी 5 सिंटेक्स टँक ठेवून पाण्याची व्यवस्था .
  • दीक्षाभूमी परिसरालगत कचरा टाकण्याकरिता 200 कचऱ्याच्या पेटयांची (ड्रम) व्यवस्था
  •  दीक्षाभूमी व लगतच्या परिसरात 1000 (Toilet Seats) अस्थायी शौचालय
  • 7 फिरते शौचालयासह इतर प्रसाधनगृहांच्या  साफ-सफाईसाठी तीन पाळीत एकूण 60 कर्मचाऱ्यांची नियुक्ती
  • 4 सक्शन कम जेटींग मशीनद्वारे शौचालयाची स्वच्छता
  • दीक्षाभूमी परिसरात स्थायी सी.सी.टी.व्ही कॅमेरे
  • परिसराबाहेर गर्दीच्या ठिकाणी 8 अस्थायी कॅमेरे, 10 जनरेटर व्यवस्था
  • दीक्षाभूमी परिसरात 460 पथ दिव्यांची अतिरिक्त प्रकाश व्यवस्था
  • मनपाच्या परिवहन विभागाद्वारे सीताबर्डी रेल्वे स्टेशन, अजनी रेल्वे स्टेशन, गणेशपेठ बसस्थानक, मोरभवन शहर बसस्थानक ते दीक्षाभूमी, दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस येथे ये-जा करण्यासाठी बसेसची व्यवस्था
  • पावसाच्या परिस्थीतीत दीक्षाभूमी जवळ असलेल्या मनपा शाळेच्या इमारतीमध्ये व जिल्हाधिकारी नागपूर कार्यालयाकडून अधिगृहीत केलेल्या इतर शासकीय संस्थाच्या इमारती व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या इमारतीमध्ये निवाऱ्याची व्यवस्था
  • दीक्षाभूमी परिसराच्या चारही बाजूनी येणा-या प्रत्येक रस्त्यावरील चौकामध्ये मनपाद्वारे आरोग्य केंद्र, तसेच 24 तास अँब्युलंसची व्यवस्था