जालना. Manoj Jarange Patil News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना 500 कोटी रुपये दिल्याचा उल्लेख असलेली कथित ऑडिओ क्लिप समोर आली होती. या ऑडिओ क्लिपमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सुरू असून, बुधवारी एसआयटीचे पथक जालना जिल्ह्यातील अंकुशनगर येथे मनोज जरांगे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. पथकाने जवळपास दोन तास जरांगे यांची चौकशी केली.

या चौकशीदरम्यान जरांगे यांनी संबंधित ऑडिओ क्लिप असलेला पेन ड्राइव्ह तपास पथकाकडे सुपूर्द केला. एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी हा पेन ड्राइव्ह ताब्यात घेऊन सील केला. तसेच नियमानुसार पंचनामा करण्यात आला असून, या पंचनाम्यावर मनोज जरांगे यांचीही स्वाक्षरी घेण्यात आली आहे. त्यामुळे आता या कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाची सत्यता आणि त्यामागील नेमके तथ्य तपासण्याच्या दृष्टीने एसआयटीकडून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

दोन तास चौकशी, पेन ड्राइव्ह सील

500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा उल्लेख असलेल्या ऑडिओ क्लिपप्रकरणी एसआयटीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. याच अनुषंगाने बुधवारी तपास पथक अंकुशनगर येथे जरांगे यांच्या घरी पोहोचले. अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे या ऑडिओ क्लिपबाबत विविध प्रश्न विचारल्याची माहिती आहे. चौकशीदरम्यान जरांगे यांनी संबंधित ऑडिओ क्लिप असलेला पेन ड्राइव्ह तपासासाठी दिला.

एसआयटीने पेन ड्राइव्ह ताब्यात घेतल्यानंतर तो सील केला. पंचनामा करून त्यावर जरांगे यांची स्वाक्षरी घेण्यात आली. आता या पेन ड्राइव्हमधील ऑडिओची तांत्रिक तपासणी, संभाषणातील आवाजांची पडताळणी आणि क्लिपची सत्यता तपासण्यावर तपास यंत्रणेचा भर असणार आहे.

ऑडिओ क्लिपचा स्रोत सांगण्यास जरांगेंचा नकार

    या चौकशीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संबंधित ऑडिओ क्लिप नेमकी कुठून मिळाली, हा आहे. मात्र, ऑडिओ क्लिपचा स्रोत अर्थात सोर्स आत्ताच सांगणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. त्यामुळे ही क्लिप कोणी रेकॉर्ड केली, ती जरांगे यांच्यापर्यंत कशी पोहोचली आणि त्यामागे नेमके कोण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

    क्लिपचा स्रोत आणि त्यातील संभाषणाची सत्यता तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे जरांगे यांनी दिलेल्या पेन ड्राइव्हच्या आधारे एसआयटी कोणते निष्कर्ष काढते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.