जेएनएन, मुंबई. लातूरमध्ये आशाताई भिसे (काँग्रेस) यांनी सरिता भिसे (भाजप) यांचा दोन मतांनी पराभव केला. हा माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे यांना मोठा धक्का मानला जात आहे. आशाताईंच्या सामाजिक कार्याला यश आले आहे. तर कौटुंबिक मतभेद असूनही काँग्रेसशी निष्ठा फळाला आली आहे, अशी चर्चा सुरु आहे.
अवघ्या 2 मतांनी पराभव
लातूरच्या रेणापूर तालुक्यातील कामखेडा जिल्हा परिषदेमध्ये ही अटीतटीची लढत झाली आहे. या लढतीमध्ये काँग्रेसच्या आशाताई भिसे यांनी त्यांचीच भावजय सरिता भिसे यांचा अवघ्या 2 मतांनी पराभव केला आहे.
लातूरमधील पक्षिय बलाबल
लातूर जिल्हा परिषदेच्या 59 जागांपैकी 52 जागांचे निकाल लागले आहेत, ज्यात काँग्रेस हा 19 जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे, तर भाजपला 17 जागांवर विजय मिळाला आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर विजयी झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 1, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 1, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1, मनसेला एक आणि 2 अपक्ष विजयी झाले आहेत.
आशाताई भिसे यांचा दांडगा जनसंपर्क
महिला उद्योजिका आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या म्हणून आशाताई भिसे यांचा मोठा जनसंपर्क आहे. महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीत त्या वर्षानुवर्षे सक्रिय आहेत.
लातूरमध्ये काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष
लातूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष होण्याची शक्यता असली तरी भाजप राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेनेच्या मदतीने बहुमतापर्यंत पोहोचू शकते. विजयी झालेले 2 अपक्ष कोणती भूमिका घेणार? यावरही सत्तेचं गणीत अवलंबून असणार आहे.
