जेएनएन, जालना: जालना जिल्ह्यातून पुन्हा एकदा दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण असताना, एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा आणि आर्थिक तंगीमुळे टोकाचा निर्णय घेत आपले जीवन संपवलं (Jalna Farmer Suicide) आहे.
आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली
माहितीनुसार, रामेश्वर खंडागळे असे या मृत शेतकऱ्याचं नाव असून, ही घटना जालना तालुक्यातील शेवगा गावात घडली आहे. रामेश्वर यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यामध्ये त्यांनी आपल्या दुःखाची आणि विवंचनेची नोंद केली आहे.
अनुदान मिळालं असतं तर…
त्या चिठ्ठीत त्यांनी लिहिलं आहे की, "दिवाळी आलीय, पण पोरांना कपडे घेण्यासाठी पैसे नाहीत. शेतात नुकसान झालं, सरकारकडून मदत मिळाली नाही. अनुदान मिळालं असतं, तर दिवाळी साजरी झाली असती..." अशी वेदनादायी ओळ त्यांनी लिहिली आहे.
शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
या मन हेलावून टाकणाऱ्या चिठ्ठीमध्ये त्यांच्या मानसिक स्थितीची झलक दिसते. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणातही शेतकऱ्याच्या घरात अंधार पसरला. कर्जबाजारीपण, उत्पन्नाचा अभाव आणि पिकांचे नुकसान या ताणांमुळे त्यांनी शेवटी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
सापडलेली चिठ्ठीही जप्त
घटनेची माहिती मिळताच, मौजपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. पोलिसांनी शेतकऱ्याजवळ सापडलेली चिठ्ठीही जप्त केली आहे.
परिसरात हळहळ
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गावकऱ्यांसह स्थानिक शेतकरी संघटनांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि अपुऱ्या अनुदानामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होत असल्याने समाजमन सुन्न झाले आहे.
