एजन्सी, जालना. Jalna Accident News: जालना जिल्ह्यात एका भरधाव कंटेनर ट्रकने दोन मोटारसायकलींना धडक दिल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती सोमवारी एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

छत्रपती संभाजीनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील महाकाळा गावाजवळ रविवारी सायंकाळी 7 वाजता ही घटना घडली.

तिघांचा मृत्यू

विकास जाधव (28), त्यांची पत्नी साक्षी जाधव (22) आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा अथर्व जाधव अशी मृतांची ओळख पटली आहे. ते अंबड तहसीलमधील रोहिलागड येथील रहिवासी आहेत.

लग्नाहून परताना झाला अपघात

    "हे कुटुंब बीडमधील उमापूर येथून नातेवाईकाच्या लग्नाला उपस्थित राहून घरी परतत होते. ते होंडा शाईन मोटरसायकलवरून प्रवास करत होते. मागून येणाऱ्या एका कंटेनर ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. तिघांचाही जागीच मृत्यू झाला,” असे गोंदी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण हवाले यांनी सांगितले.

    साक्षी जाधव गर्भवती असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

    दोघे जखमी

    ट्रकने दुसऱ्या मोटारसायकललाही धडक दिली. यात चालक संतोष बनसोडे (29) आणि त्यांची पत्नी मोनिका संतोष बनसोडे (25) गंभीर जखमी झाले, असे हवाले यांनी सांगितले.