जेएनएन, मुंबई/छत्रपती संभाजीनगर: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण –इस्रायल युद्धामुळे जागतिक स्तरावर ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम होत असून त्याचे पडसाद आता महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातही उमटू लागले आहेत. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयने प्रोपेन आणि ब्युटेन वायूचा वापर केवळ घरगुती एलपीजी उत्पादनासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगांना मिळणारा गॅस पुरवठा तातडीने थांबवण्यात आला असून उद्योगांचे कामकाज ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे.

उद्योगांपुढे गॅस टंचाईचे मोठे संकट

छत्रपती संभाजीनगरमधील शेंद्रा, वाळूज आणि चित्तेगाव औद्योगिक वसाहतींमधील अनेक उद्योग गॅसवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. या भागातील सुमारे 30 मोठ्या कारखान्यांमध्ये उत्पादनासाठी प्रोपेन-ब्युटेन गॅसचा वापर केला जातो. मात्र पुरवठा बंद झाल्याने उद्योगांकडे असलेला साठा आता वेगाने संपत चालला आहे. 

उद्योग क्षेत्रातील तज्ञांच्या माहितीनुसार, सध्या कारखान्यांकडे फक्त दोन दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास पुढील काही दिवसांत अनेक उद्योगांना उत्पादन बंद करावे लागू शकते. त्याचा परिणाम हजारो कामगारांच्या रोजगारावर आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

संभाजीनगर औद्योगिक क्षेत्रात दररोज साधारण 250 ते 300 टँकर गॅसची गरज असते. मात्र सध्या पुरवठा थांबल्याने उद्योगांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. उद्योग संघटनांनी केंद्र सरकारकडे पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. 

देशात इंटरनेट सेवांवरही संकटाची शक्यता? 

    दरम्यान, मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक डिजिटल नेटवर्कवरही परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आखातातील अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्ग असलेली स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सामुद्रधुनी केवळ तेल वाहतुकीसाठीच नव्हे तर जागतिक इंटरनेट प्रणालीसाठीही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. 

    या सामुद्रधुनीच्या समुद्रतळाशी जगातील अनेक देशांना जोडणाऱ्या फायबर ऑप्टिक केबल्सचे मोठे जाळे आहे. जगातील बहुतांश इंटरनेट डेटा हा उपग्रहांऐवजी समुद्राखालील फायबर ऑप्टिक केबल्सद्वारे वाहत असतो. भारताची आंतरराष्ट्रीय इंटरनेट कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात अरबी समुद्रातून आखाती प्रदेश आणि युरोपला जाणाऱ्या या केबल्सवर अवलंबून आहे. 

    तज्ज्ञांच्या मते, भारतातून पश्चिमेकडे जाणाऱ्या इंटरनेट ट्रॅफिकपैकी सुमारे एक तृतीयांश डेटा या क्षेत्रातून प्रवास करतो. त्यामुळे जर होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात युद्ध चिघळले किंवा केबल्सचे नुकसान झाले, तर भारतासह अनेक देशांमध्ये इंटरनेट सेवा मंदावण्याची किंवा काही प्रमाणात ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    उद्योग आणि डिजिटल क्षेत्र दोन्ही चिंतेत

    एकीकडे गॅस टंचाईमुळे उद्योग उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना दुसरीकडे इंटरनेट नेटवर्कवर संभाव्य परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे. उद्योग संघटना आणि तज्ज्ञांनी केंद्र सरकारने तातडीने पर्यायी ऊर्जा पुरवठा आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.